राज्यातील 28 स्थळांचा विकास करणार 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 27 मार्च 2017

मुंबई - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांसाठी ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या तब्बल 28 स्थळांचा विकास करण्याचा निर्णय घेतला असून, यासाठी 170 कोटींपैकी चालू वर्षात वीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहायमंत्री राजकुमार बडोले यांनी सांगितले. सामाजिक समतेच्या लढ्याची सुरवात केलेल्या महाडच्या चवदार तळ्याचा परिसर, क्रांतिस्तंभ आणि सभागृहाचे नूतनीकरण, तसेच आंबावडे या बाबासाहेबांच्या गावातील स्मारकाचा विकास करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. 

माता रमाई यांचे जन्मस्थान असलेले वणंद, शेतकऱ्यांचा ऐतिहासिक संप साकारणारे चरी या अलिबागमधील स्मारकाचा, तसेच पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथील आंबेडकरांच्या बंगल्याची डागडुजी व सुशोभीकरण करण्यात येणार आहे. बाबासाहेबांना अस्पृष्य म्हणून बैलगाडीतून उतरवण्याचा प्रकार घडलेल्या तदवळे (जि. उस्मानाबाद) या गावात विकासकामे करण्यात येणार असल्याचेही बडोले म्हणाले. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 16 ऑक्‍टोबर 1956 रोजी चंद्रपूर येथे दीक्षा दिलेल्या स्थळाचे सुशोभीकरण, गोंदिया जिल्ह्यातील देसाईगंज येथील दीक्षाभूमी, बुलडाणा जिल्ह्यातील पातुर्डा येथील मातीच्या बुद्धविहाराचे नूतनीकरण, तसेच सातारा जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्री भीमाबाई यांचे स्मारक उभारण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. संत चोखामेळा यांचे जन्मस्थान असलेल्या मेव्हणाराजा या ऐतिहासिक स्थळाचे सुशोभीकरण, लहुजी वस्ताद साळवे यांचे संगमवाडी (जि. पुणे) येथे स्मारकाचा विकास करण्यात येणार आहे. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या वाटेगाव (जि. सांगली) येथे स्मारक उभारण्यात येणार आहे. नायगाव (जि. सातारा) येथे सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी स्मारकाचा विकास करण्यात येणार आहे. सातारा येथील ज्या शाळेत डॉ. आंबेडकर शिकले, त्या ऐतिहासिक एलिमेंटरी स्कूलमध्ये वाचनालय आणि ग्रंथालयाचा विकास करण्यात येणार आहे. 

ऐतिहासिक स्थळांचा विकास 
औरंगाबाद येथील मिलिंद कॉलेजमध्ये मध्यवर्ती अभ्यासिका आणि वाचनालयाचा विकास करण्यात येणार आहे. सोबतच काडाईकोंड या रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळाचा विकास करण्यात येणार असल्याचेही बडोले या वेळी म्हणाले. देहूरोड येथील ऐतिहासिक बुद्धविहार, गोंदिया जिल्ह्यातील भीमघाट येथील बुद्धविहार, धम्मकुटी, कालीमाटी येथील बुद्धविहार, ठाणे जिल्ह्यातील किन्हवली येथे स्मारक उद्यान, सांस्कृतिक भवन आदी स्थळांचा विकास करण्याचा निर्णय घेतला असून, निधी उपलब्ध करून दिल्यामुळे या कामांना गती मिळेल, असेही बडोले म्हणाले. 

Web Title: Development of 28 spots in the state