विकास मंडळांनी सक्षमपणे काम करण्याची गरज - राज्यपाल

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 24 एप्रिल 2018

मुंबई - राज्यातील विकास मंडळांनी अधिक सक्षमपणे काम करण्याची गरज असून, या मंडळांना आवश्‍यक ते मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे. यासाठी नियोजन विभागाने कालबद्ध कार्यक्रम हाती घ्यावा, असे आवाहन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आज येथे केले.

मुंबई - राज्यातील विकास मंडळांनी अधिक सक्षमपणे काम करण्याची गरज असून, या मंडळांना आवश्‍यक ते मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे. यासाठी नियोजन विभागाने कालबद्ध कार्यक्रम हाती घ्यावा, असे आवाहन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आज येथे केले.

राज्यातील विदर्भ विकास मंडळ, मराठवाडा विकास मंडळ, उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळ यांची संयुक्त बैठक राजभवन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. त्या वेळी राज्यपाल बोलत होते.

राज्यपाल या वेळी म्हणाले, विकास मंडळांनी कार्यक्षमता वाढवून कालबद्ध पद्धतीने या तीनही विभागांचा विकास अधिक होण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. काही भागात अनुशेष दूर करण्यासाठी निधीचे समान वाटपाचे जे सूत्र आहे ते बदलण्याची गरज असून, विभागनिहाय निधी वाटपासाठी आवश्‍यक त्या सुधारणा नियोजन विभागाने येत्या तीन महिन्यांत कराव्यात. विकास मंडळांना मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी रिक्त जागा भरण्यासाठी नियोजन विभागाने प्रक्रिया हाती घ्यावी. आदिवासी भागातील मुले शिक्षणाच्या हक्कापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे राज्यपालांनी सांगितले.

मुख्यमंत्री या वेळी म्हणाले की, विदर्भ, मराठवाडा भागातील सिंचन, आरोग्य, शिक्षण, कृषी या क्षेत्रातील विकासासाठी तीनही विकास मंडळांनी विशेष लक्ष केंद्रित करून काम करण्याची गरज आहे. तीनही विकास मंडळांनी केलेल्या सूचनांच्या अभ्यास आणि समन्वयासाठी एक समिती असणे आवश्‍यक आहे. गडचिरोली भागातील मलेरियाचा प्रादुर्भाव आणि आदिवासी भागातील कुपोषणाचे प्रमाण लक्षात घेता त्यावर प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यासाठी आणि त्याच्या समूळ उच्चाटनासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, असे आवाहन त्यांनी या वेळी केले. विदर्भ, मराठवाड्यातील कृषी पंपांना वीज जोडणी मिळण्यासाठी प्रयत्न करावे. त्याचबरोबर माजी मालगुजारी तलावांचे पुनरुज्जीवन करून त्या माध्यमातून नागपूर विभागात सिंचनाची क्षमता वाढवावी.

Web Title: Development Board work c. vidyasagar rao