तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्यास मंजुरी 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 15 मार्च 2017

मुंबई - राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र जोतिबा तीर्थक्षेत्र देवस्थान आणि वाशीम जिल्ह्यातील श्री संत सखाराम महाराज तीर्थक्षेत्र, अमरावती जिल्ह्यातील श्रीसंत गुलाबराव महाराज जन्मस्थळ आणि भक्तिधाम, श्री क्षेत्र रिद्धपूर या पाच देवस्थानाच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीने मंगळवारी मंजुरी दिली. 

मुंबई - राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र जोतिबा तीर्थक्षेत्र देवस्थान आणि वाशीम जिल्ह्यातील श्री संत सखाराम महाराज तीर्थक्षेत्र, अमरावती जिल्ह्यातील श्रीसंत गुलाबराव महाराज जन्मस्थळ आणि भक्तिधाम, श्री क्षेत्र रिद्धपूर या पाच देवस्थानाच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीने मंगळवारी मंजुरी दिली. 

तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजुरी देण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज "वर्षा' या शासकीय निवासस्थानी शिखर समितीची बैठक झाली. या वेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार, उद्योग राज्यमंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील, आमदार ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू, अमित झनक, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी, प्रधान सचिव सुनील पोरवाल आदी उपस्थित होते. 

फडणवीस म्हणाले, की तीर्थक्षेत्रांचा विकास आराखडा बनविताना इतर पायाभूत सुविधांबरोबरच सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, बस आगार, पोलिस चौकी यांचाही प्राधान्याने समावेश करावा. तसेच भक्तनिवास, शौचालय आदींच्या देखभाल दुरुस्तीचीही जबाबदारी सोपविण्यात यावी. जेणेकरून पुढील काळातही तीर्थक्षेत्रे स्वच्छ व सुंदर राहतील. अर्थमंत्री मुनगंटीवार म्हणाले, की विकास आराखड्याची अंमलबजावणी करताना त्यांच्या कामाचे नियोजन, दर्जा याकडेही विशेष लक्ष द्यावे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राची तरतूदही या आराखड्यात करण्यात यावी. 

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा येथील श्री क्षेत्र जोतिबा देवस्थान विकास आराखड्याच्या 25 कोटी रुपयांच्या कामालाही या वेळी शिखर समितीने मंजुरी दिली आहे. अमरावती जिल्ह्यातील लोणी (ता. नांदगाव) येथील श्रीसंत गुलाबराव महाराज जन्मस्थळाच्या सोयीसुविधा व पायाभूत विकासासाठी तयार करण्यात आलेल्या सहा कोटी 69 लाख रुपयांच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आली. श्रीसंत गुलाबराव महाराज यांची कर्मभूमी असलेल्या चांदूरबाजार तालुक्‍यातील प्रल्हादपूर येथील भक्तिधाम परिसराच्या विकासासाठी 24.99 कोटी रुपयांच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्‍यातील श्री क्षेत्र रिद्धपूर हे महानुभव पंथांची काशी म्हणून ओळखली जाते. या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 25 कोटींचा आराखडा मंजूर केला आहे. वाशीम जिल्ह्यातील लोणी (ता. रिसोड) येथील श्री संत सखाराम महाराज संस्थान तीर्थक्षेत्र विकासासाठी वीस कोटींच्या आराखड्यास आज शिखर समितीने मंजुरी दिली आहे. 

Web Title: Development of the design approval religious places