राज्यातील तीर्थक्षेत्रांचा होणार कायापालट; सरकारकडून 298 कोटी

वृत्तसंस्था
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

तीर्थक्षेत्र आणि इतर स्थळांच्या विकासासाठी चालू वित्तीय वर्षात २९८ कोटी ४० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

मुंबई : तीर्थक्षेत्र आणि इतर स्थळांच्या विकासासाठी चालू वित्तीय वर्षात २९८ कोटी ४० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. यातून स्थळ आणि परिसराचा विकास करून भाविकांना अत्यावश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील.

देहू, आळंदी, पंढरपूर, भंडारा डोंगर, पालखी तळ, नेवासा परिसरात मुलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी चालू आर्थिक वर्षात ८० कोटी ३५ लाख, शेगांव येथील श्री संत गजानन महाराज समाधीसाठी ४० कोटी ६७ लाख, अमरावती जिल्ह्यातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या श्रीक्षेत्र मोझरीसाठी २१ कोटी ८४ लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

अमरावती जिल्ह्यातील  वलगांव येथील संत गाडगेबाबांच्या समाधीस्थळासाठी ६ कोटी ४४ लाख, अमरावती जिल्ह्यातील श्रीक्षेत्र कौंडण्यपूरसाठी १ कोटी २७ लाख, वर्धा येथील सेवाग्राम विकासासाठी ५१ कोटी ३६ लाख, पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर तीर्थक्षेत्रासाठी ४५ कोटी, नागपूर जिल्ह्यातील ताजबाग साठी ५० कोटी १० लाख, अमरावती जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील कृषीभूषण शिक्षणमहर्षि स्व. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या जन्मस्थळासाठी १ कोटी ३६ लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आल्याची माहितीही मुनगंटीवार यांनी दिली.

(सौजन्य : डीजीआयपीआर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Development of Pilgrimage area Soon Government Approved 298 Crores