
Devendra Fadnavis:राजस्थान जिंकण्यासाठी फडणवीसांची पावसात सभा... काँग्रेस सरकारला हरवण्यासाठी थोपटला दंड
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या राजस्थानमध्ये आहेत. यावेळी त्यांनी राजस्थानमधील परिवर्तन यात्रांसोबत सहभागी होत प्रवास केला. फडणवीसांच्या राजस्थामधील तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवशी त्यांनी पुष्कर ते अजमेर असा प्रवास केला. अजमेरला पोहोचल्यानंतर त्यांनी पाऊस सुरु असताना तिथे जमलेल्यांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला. प्रशासनातील दलाल संपवण्याचं काम मोदींनी केलं, असं फडणवीस म्हणाले.
राजस्थान दौऱ्यावर असलेले देवेंद्र फडणवीस अजमेरमधील सभेत म्हणाले की, "आज प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचे 6000 रुपये दिल्लीतून निघतात, तेव्हा ते पूर्ण 6000 रुपये थेट शेतकर्यांच्या खात्यात जातात. राजीव गांधी म्हणायचे, पूर्वी 85 पैसे दलाल घ्यायचे आणि 15 पैसे सामान्य माणसाला मिळायचे, आज दलालांची संपूर्ण यंत्रणा नष्ट करण्याचे काम मोदीजींनी केले आहे."
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तिसऱ्या दिवशी विविध ठिकाणी सभा घेत, तेथिल लोकांना संबोधित केले. यामध्ये केकडी, नसिराबाद, किशनगड, अजमेर ग्रामीण आणि अजमेर शहराचा समावेश आहे. यावेळी फडणवीसांसोबत सी.पी.जोशी , विजयाताई रहाटकर आणि स्थानिक नेते देखील होते. देवेंद्र फडणवीस यांनी परिवर्तन रथ यात्रेत सहभाग घेतला होता, यावेळ त्यांचं प्रत्येक ठिकाणी स्वागत करण्यात आलं. तिसऱ्या दिवशी त्यांनी पुष्कर येथील ब्रह्मदेवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले की, "राजस्थानात भाजपाला जे परिवर्तन घडवायचय, ते परिवर्तन म्हणजे केवळ सत्ता परिवर्तन नाही. सत्ता परिवर्तन म्हणजे एक मुख्यमंत्री बदलून दुसरा किंवा एक मंत्री बदलून दुसरा मंत्री असे नाही. तर दलित, पीडित, शोषित, सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन करण्यासाठी हे परिवर्तन हवे आहे. हे समाज परिवर्तनाचे मिशन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 कोटी लोकांच्या जीवनात मोठे परिवर्तन केले आणि त्यांना गरिबी रेषेतून बाहेर काढले." (Latest Marathi News)