मोदींचा गुण मुख्यमंत्र्यांनाही लागला; अण्णा हजारेंची टीका

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 10 जानेवारी 2019

- मोदी यांच्याकडून अपेक्षाभंग
- राफेल'बाबत आरोपात तथ्य
- अण्णा हजारे यांची टीका
- मुख्यमंत्र्यांना गुण लागला

राळेगणसिद्धी- "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक काळात खूप आश्वासने दिली. आता मोदी यांनाच त्याची आठवण राहिली नाही; मात्र मतदार त्यांना येत्या निवडणुकीत आश्‍वासनांची आठवण करून दिल्याशिवाय राहणार नाहीत. मोदी देशात काही तरी चांगला बदल करतील, असे वाटले होते; मात्र त्यांनी माझा व जनतेचाही अपेक्षाभंग केला,'' अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी टीका केली.

ते म्हणाले, ""बोलतात तसे मोदी वागत नाहीत. त्यामुळे आता त्यांच्या शब्दाला वजन राहिले नाही. लोकपाल व लोकायुक्त कायदा केल्यानंतर तो लागू करू, असे त्यांनी निवडणूक प्रचारादरम्यान सांगितले होते; मात्र आता सत्तेवर येऊन चार वर्षे झाली, तरीही त्यांनी हा कायदा अमलात आणला नाही. शेतमालाला उत्पादनखर्चाच्या दीडपट बाजारभाव देण्याचे जाहीर केले होते; पण त्याचीही पूर्तता केलेली नाही.''

""मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चांगले मुख्यमंत्री होते. त्यांच्याबाबत मी चांगले बोलत होतो, कारण ते चांगले वागत होते; मात्र आता त्यांनाही मोदी यांचा गुण लागला. त्यांनाही राज्यात सत्तेवर येऊन चार वर्षे होत आली, तरीही लोकायुक्ताची नियुक्ती त्यांनीही केली नाही. मी त्यांनाही लोकायुक्त नेमणूक करण्याबाबत सहा पत्रे पाठविली; मात्र त्यांनीही अजून निर्णय घेतलेला नाही,'' असे हजारे म्हणाले.

"राफेल'बाबत आरोपात तथ्य 
अण्णा हजारे म्हणाले, "राफेल'बाबत विरोधक संसदेत चौकशीची मागणी करीत आहेत; मग मोदी चौकशीला सामोरे का जात नाहीत? आता आम्हीही "राफेल'बाबत माहिती व पुरावे गोळा करीत आहोत. येत्या चार दिवसांत माहिती मिळाल्यावर आम्ही त्यावर स्पष्ट बोलू. एका विमानाला दुप्पट पैसे दिले. हा जनतेचा पैसा आहे व तो एका उद्योगपतीच्या घरात गेला, ही बाब योग्य नाही. हा देशाला धोका आहे. "राफेल'बाबत होणाऱ्या आरोपांत तथ्य वाटते.'' 

Web Title: Devendra Fadanvis is behaving like Narendra Modi say Anna Hajare