Devendra Fadanvis: गोपीनाथ मुंडेंच्या कार्यक्रमाला फडणवीस गैरहजर; प्रदेशाध्यक्षांनी दिलं स्पष्टीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadanvis

Devendra Fadanvis: गोपीनाथ मुंडेंच्या कार्यक्रमाला फडणवीस गैरहजर; प्रदेशाध्यक्षांनी दिलं स्पष्टीकरण

नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे याठिकाणी आज (18 मार्च) लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाला राज्यासह केंद्रीय मंत्र्यांसह अनेक दिग्गज नेत्यांची उपस्थिती असणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत. मात्र या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगु लागली होती. त्यावर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

चंद्रशेखर बावणकुळे यांनी स्पष्टीकरण देताना म्हंटलं की, या कार्यक्रमामध्ये नितीन गडकरी आणि इतर मान्यवरांना बोलावलं आहे, पुढच्या एका कार्यक्रमात मी आणि देवेंद्रजी जाणार आहोत, कार्यक्रमाचे दोन भाग आहेत, गोपीनाथजी मुंडे हे आमचे सुद्धा स्थान आहे.

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा 16 फुटी पूर्णाकृती पुतळा सिन्नरच्या नांदूर शिंगोटे येथे बसवण्यात आला असून या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा आज पडणार आहे. दोन एकर परिसरात साडे सात कोटी रुपयांचा निधी खर्च करुन ‘गोपीनाथ गड’ हे भव्य स्मारक उभारण्यात आले आहे.

या परिसरास गोपीनाथ गड असे नाव देण्यात आले आहे. या लोकार्पण सोहळ्यासाठी राज्यातील अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. परळीहून भाजप नेत्या पंकजा मुंडे या देखील उपस्थित राहणार आहेत. मात्र देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित नसणार आहेत. त्यामुळे आयोजकांनी फडणवीसांना निमंत्रण का दिले नाही? फडणवीसांनी कार्यक्रमाला येणे टाळले का? असे प्रश्न राजकीय नेत्यांकडून केले जात होते.

दरम्यान या लोकार्पण सोहळ्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री दादा भुसे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार, मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मंत्री छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे आदी नेते उपस्थित असणार आहेत. हे सर्व नेते एकाच व्यासपीठावर दिसून येणार आहेत. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नसणार आहेत. लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्याचे फडणवीसांना निमंत्रणच नाही का? अशा राजकीय चर्चांना उधाण आलं होतं.