
Devendra Fadnavis : "कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतर सुविधांचे तत्व आम्ही मान्य केले, मात्र..."
Old Pension : जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या वादग्रस्त मुद्द्यावर यशस्वी चर्चेनंतर महाराष्ट्रातील १८ लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी आज (सोमवार) आपला आठवडाभराचा बेमुदत संप मागे घेतला. माध्यमांशी बोलताना संपकरी संघटनेचे समन्वयक विश्वास काटकर यांनी ही माहिती दिली. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, कर्मचाऱ्यांचा संप मिटल्याची बातमी मला मिळाली, ही आनंदाची बातमी आहे. कुठलाही अहंकार न ठेवता कर्मचाऱ्यांना जी सामाजिक सुरक्षा हवी आहे. निवृत्तीनंतर ज्या सुविधा हव्या आहेत. त्याचे तत्व आम्ही मान्य केले मात्र त्याचे वर्किंग कसे करावे, याबाबत समिती काम करत आहेत. समितीचा अहवाल तीन महिन्यात येईल. सरकारने आडमूठी भूमिका न घेतल्यामुळे कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचाः अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....
सर्व कर्मचारी आमचे आहेत त्यामुळे सरकारच्या वतीने त्यांना जे चांगले देता येईल ते देण्याची आमची जबाबदारी आहे. त्यात कुठेही आमची आडमूठी भूमिका नाही आहे. समितीच्या अहवालावर आपल्याला पुढची कारवाई करता येईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
समितीने घेतलेला निर्णय सर्वांना लागू होईल-
समितीला तीन महिन्याचा वेळ दिलेला आहे, त्यामुळे ही टाईम बाउंडच आहे. ही समिती जुनी पेन्शन योजना आणि नवी पेन्शन योजना संदर्भात अभ्यास करेल आणि त्यानंतर कर्मचाऱ्यांना आवश्यक असलेले लाभ कसे देता येईल, यासंदर्भातला अहवाल देईल. कर्मचाऱ्यांच्या सर्व संघटना या समिती सोबत चर्चा करतील, असे फडणवीस म्हणाले.
आम्ही पहिल्याच दिवशी कर्मचाऱ्यांना सांगितलं होतं की जे काही समितीचा अहवाल (outcome) असेल त्यामध्ये आपण कुणालाही वगळणार नाही. सर्वांना सोबत घेऊनच आपल्याला चालायच आहे. त्यामुळे निश्चितच समितीने घेतलेला निर्णय सर्वांना लागू होईल, असे देखील देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
विश्वास काटकर काय म्हणाले?-
तीन महिन्यांमध्ये सरकार मागण्या पूर्ण करेल, त्यामुळे उद्यापासून संप मागे घेत आहोत असं संपकऱ्यांच्या वतीने समन्वयक विश्वास काटकर यांनी माध्यमांना सांगितलं. उद्यापासून कर्मचाऱ्यांनी कामावर हजर होण्याचं आवाहन काटकर यांनी केलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या शिष्टमंडळामध्ये १६ सदस्य होते. मागील काही वेळापासून संपकरी आणि सरकारसोबत चर्चा सुरु होती. ही चर्चा यशस्वी झाल्याची माहिती आहे. सरकार संपकऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचं काटकर यांनी सांगितले. जुनी पेन्शन योजना लागू करण्याचं सरकारने आश्वासन दिल्याचे काटकर म्हणाले.