सत्तेवरून पाय उतार होताच, फडणवीस यांना कोर्टाचं समन्स 

टीम ई-सकाळ
शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019

नागपूरमधील पोलिस निरीक्षक महेश बनसोडे यांनी कोर्टाचे समन्स देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी पोहचवले आहे. 

नागपूर : राज्यात नाट्यमय घडामोडींनंतर सत्तांतर घडले आहे. पाच वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेल्या देवेंद्र फडणवीस यांना पायउतार व्हावे लागले असून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. या सत्तांतराच्या घडामोडीनंतर लगेचच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अडचणीत आले आहेत. त्यांना कोर्टाने समन्स बजावले आहे. 

ताज्या बतम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

फडणवीसांना समन्स कशासाठी?
काल मुंबईत शिवाजी पार्कवर मैदानावरील दिमाखदार सोहळ्यात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्या सोहळ्याला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील उपस्थित होते. पण, आज सकाळी त्यांना कोर्टानं समन्स बजावलंय. विधानसभा निवडणुकीत फडणवीस यांनी आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञा पत्रात त्यांनी माहिती लपवल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. फडणवीस यांच्यावर दोन गुन्हे दाखल आहेत. त्याची माहिती त्यांनी प्रतिज्ञापत्रात दिलेली नव्हती. त्यामुळं निवडणुकीतही त्यावरून विरोधक आक्रमक झाले होते. आता या प्रकरणी नागपूरच्या स्थानिक न्यायालयाने त्यांना समन्स बजावले आहे. नागपूरमधील पोलिस निरीक्षक महेश बनसोडे यांनी कोर्टाचे समन्स फडणवीस यांच्या निवासस्थानी पोहचवले आहे. 

आणखी वाचा - काय आहे आजचा सामनाचा अग्रलेख

आणखी वाचा - फडणवीस आक्रमक सरकारवर ट्विटरवरून केली टीका

फडणवीस आक्रमक
दरम्यान, उद्धव ठाकरे यांचा शपथविधी झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी देवेंद्र फडणवीस आक्रमक झाले आहेत. त्यांनी काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील चर्चेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे. मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत जर, बहुमत सिद्ध करण्याविषयी चर्चा होत असले तर, तुम्ही बहुमताच्या बाता कशाला मारता, अशा आशयाचे ट्विट फडणवीस यांनी केले आहे. भाजपने सध्या विरोधीपक्षनेते पदासाठी फडणवीस यांचे नाव जाहीर केले आहे. त्यामुळं फडणवीस या्ंनी तातडीने आपल्या कामाला सुरुवात केल्याचं मानलं जातंय. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: devendra fadnavis got summons from court for non-disclosure of criminal cases election affidavit