मंत्रिमंडळ खांदेपालटास भाजपा श्रेष्ठींचा हिरवा कंदील 

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis

मुंबई : राज्याच्या मंत्रिमंडळ खांदेपालटास भाजपा श्रेष्टींचा हिरवा कंदील मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुचवलेल्या बदलास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी संमती दिली आहे. या खांदेपालटात खात्यांचा फेरबदल होणार असल्याने अनेकांना धक्‍का बसणार आहेत; तर काही जणांना डच्चू दिला जाणार आहे. यामध्ये कॅबिनेट तसेच राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. 

राज्यात नगरपालिका, महानगरपालिका तसेच जिल्हा परिषदा निवडणुकांत भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली क्रमांक एकचा पक्ष म्हणून यश मिळविले. नोटाबंदीनंतर देशात मोदी यांच्यावर विरोधी पक्षांकडून तीव्र टीका होत होती. अशावेळी राज्यातील नगरपरिषदेची पहिलीच निवडणुक जिंकून मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपले कसब दाखवले होते. त्याची दखल मोदी यांनी घेताना फडणवीस यांच्यावरील विश्‍वास दृढ करताना जाहीर कौतुक केले होते. त्यानंतर दिवसेंदिवस मुख्यमंत्री फडणवीस यांचे पक्षात स्थान बळकट होत गेल्याचे मानले जाते. 

काही दिवसांपूर्वी दिल्लीत निती आयोगाच्या बैठकीला गेल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांची भेट घेऊन राज्यातील मंत्रिमंडळाच्या संभाव्य खांदेपालटाचा आराखडा कानावर घातल्याचे सांगितले जाते. यामध्ये फडणवीस यांनी मंत्रिमंडळातील पाच ते सहा जणांना बाहेरचा रस्ता दाखवण्याचा मनसुबा व्यक्‍त केला होता. त्यास मोदी आणि शहा यांनी संमती दिल्याचे समजते. डच्चू देण्यामध्ये एका वजनदान मंत्र्यांबाबतही चर्चा करण्यात आली. तूर्त याबाबत काहीही ठोस निर्णय घेण्यात आला नाही. मात्र ऐनवेळी त्या मंत्र्याबाबत कोणताही निर्णय होऊ शकतो. त्याच्याकडील एखादे खातेही काढले जाऊ शकते; तर डच्चू देण्यात येणाऱ्या मंत्र्यांमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे समर्थकांबरोबर इतरांचाही समावेश असल्याचे शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. 

मुख्यमंत्री फडणवीस यांना मंत्रिमंडळाचा कायापालट आपल्या मनाप्रमाणे करावयाचा आहे. 2019 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी लढण्यासाठी मंत्रिमंडळात प्रादेशिक प्रतिनिधीत्त्व देत भाजपाला स्वबळावर यश संपादन करावयाचे आहे. यासाठी आपणास आपल्या पद्धतीने मंत्रिमंडळात फेरबदल करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती फडणवीस यांनी केली असता ती मोदी-शाह यांच्याकडून मान्य करण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते. त्यानुसार पश्‍चिम महाराष्ट्राला प्रतिनिधीत्त्व देण्यात येणार आहे. तसेच मंत्र्यांच्या कामगिरीवरून त्यांचे मूल्यांकन केले जाणार आहे, तर काहींचा समावेश केला जाणार आहे. यामध्ये नाशिक, सांगली, नंदुरबार, मुंबई आदी ठिकाणाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या आमदारांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात येणार आहे. मंत्रिमंडळ विस्तार तसेच खांदेपालट राष्ट्रपती निवडणुकीपूर्वी होणार असल्याची दाट शक्‍यता सूत्रांकडून व्यक्‍त केली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com