Devendra Fadnavis : सत्तासंघर्षाच्या निकालावर फडणवीस बोलले! राजकीय पंडितांना दिला मोलाचा सल्ला | Devendra Fadnavis on supreme court verdict maharashtra power struggle | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadnavis on supreme court verdict on udhhav thackeray vs eknath shinde maharashtra power struggle

Devendra Fadnavis : सत्तासंघर्षाच्या निकालावर फडणवीस बोलले! राजकीय पंडितांना दिला मोलाचा सल्ला

राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल येत्या काही दिवसात लागण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भातली सुनावणी पूर्ण झाल्यानंतर राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष या निर्णयाकडे लागले आहे. दरम्यान या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलटापालट होण्याची शक्यता आहे. यादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तासंघर्षाच्या निकालाबाबत व्यक्त करण्यात आलेल्या शक्यतांबाबत नाराजी व्यक्त केली आहे. फडणवीस म्हणले की, "मला एवढचं सांगायचं आहे की, सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाने निर्णय देण्यापूर्वीच राज्यातले काही राजकीय पंडित आणि पत्रकार यांनी निर्णयही देऊन टाकला आणि सरकारही तयार केलं."

पुढे त्यांनी म्हटले की, "मला वाटतं की हे योग्य नाहीये. हे योग्य नाहीये, सुप्रीम कोर्ट हे खूप मोठं कोर्ट आहे. शांतपणे निर्णयाची वाट बघावी. आम्ही पूर्णपणे आशादायी आहोत. काही होणार नाहीये, आम्ही सगळं कायदेशीर केलं आहे. त्यामुळे योग्य निर्णय येईल अशी आमची अपेक्षा आहे" असे फडणवीस म्हणाले आहेत.

निकाल कधी लागणार?

महाराष्ट्र सत्तासंघर्ष निकाल याबाबत सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पार पडल्यानंतर न्यायालयाने निकाल न्यायालयाने राखून ठेवला आहे. दरम्यान ही सुनावणी झाली त्या खंडपीठातील एक न्यायमूर्ती १६ मे तारखेला निवृत्त होत आहेत. त्यामुळे त्यांच्या निवृत्तीच्या आधीच हा निकाल लागणं अपेक्षित आहे. तसेच १३ आणि १४ मे या तारखेला शनिवार-रविवार असल्यामुळे सत्तासंघर्षावरील निकाल हा ११ किंवा १२ मे रोजीच लागण्याच दाट शक्यता आहे.

शरद पवार काय म्हणालेत?

सर्वोच्च न्यायालयाचा महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत निकाल कधी येणार? यासंदर्भात शरद पवार यांनी निकाल कधी लागेल हे सांगता येणार नाही. पण निकाल लवकर लागण्याची शक्यता आहे, असं सूचक विधान केलं होतं. कारण घटनापीठातील काही न्यायमूर्ती हे निवृत्त होत आहेत. त्यामुळे निकाल लवकर लागेल. बघुया काय होतयं. अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली होती.