
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा! पुण्यात होणार ५ हजार कोटींची गुंतवणूक; हजारो तरुणांना रोजगार मिळणार
Devendra Fadnavis: राज्यातील बहुचर्चित वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प हा गुजरातमध्ये गेल्यानंतर महाराष्ट्रातील विरोधी पक्षाचे नेते आक्रमक झाले होते. या मुद्द्यावरुन शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरले होते. फॉक्सकॉन- वेदांताचा सेमीकंडक्टर बनवण्याचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला.
ह्या प्रकल्पाची एकूण गुंतवणूक १ लाख ५८ हजार कोटींची आहे. हा प्रकल्प पुण्याजवळ तळेगाव येथे होणार होता. प्रचंड रोजगारनिर्मितीची क्षमता असणारा प्रकल्प महाराष्ट्रातून निसटला.
तळेगांव येथील कंपनीच्या उभारणीसाठी आवश्यक असणारे इकोसिस्टिम, ऑटोमोबाईल व इलेक्ट्रीक हब, रस्ते, रेल्वे व एअर कनेक्टीव्हिटी, ‘जेएनपीटी’ बंदराशी असणारी कनेक्टीव्हिटी, उपलब्ध असणारे तांत्रिक मनुष्यबळ व महाराष्ट्र राज्याचे गुंतवणूक धोरण हे पोषक असल्यानं वेदांत ग्रुपनं तळेगांव येथील एक हजार एकर जागेची निवड केली होती.
आता मात्र रोजगाराची वाट पाहणाऱ्या सर्व बेरोजगार तरुणांना फडणवीस यांनी चांगली बातमी दिली आहे. पुण्यात पाच हजार कोटींचा गुंतवणूक प्रकल्प येत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. अलीकडच्या काळातील ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे.
राज्यात पुणे फायनान्स हब होणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ते म्हणाले की, पुणे शहरात मोठे गुंतवणूक प्रकल्प येत आहेत.
बजाज फिनसर्व कंपनी राज्यात ५ हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. ही गुंतवणूक पुणे येथे होणार आहे. यामुळे ४० हजार जणांना रोजगार मिळणार आहे. अलीकडच्या काळातील राज्यात झालेली ही सर्वात मोठी गुंतवणूक असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
हिंदुजा ग्रुप महाराष्ट्रात एकूण 12 क्षेत्रात गुंतवणूक करणार आहे. ही गुंतवणूक तब्बल 35 हजार कोटी रुपयांची आहे. या गुंतवणुकीतून दीड लाख नागरिकांना रोजगार मिळणार असल्याचा दावा सरकारने केला होता.
या गुंतवणुकीच्या माध्यमातून प्रामुख्याने आरोग्य, शिक्षण, सायबर, मनोरंजन, नवीन टेक्नॉलॉजी, रिअल इस्टेट, मॅन्युफॅक्टरिंग अशा विविध विभागांचा समावेश होणार आहे. याबद्दलची माहिती हिंदुजा समूहाचे मुख्य जी पी हिंदुजा यांनी दिली होती.