
Nilwande Dam: 'माझ्या जन्माच्या आधीपासून प्रकल्पाला सुरवात झाली'; निळवंडे उद्घाटनावेळी फडणवीसांचा टोला
निळवंडे धरणातून आज (बुधवारी) कालव्यात पाणी सोडण्याची चाचणी यशस्वी झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याची चाचणी वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
यावेळी त्यांनी अहमदनगर जिल्हात आगामी काळात २३५ गावं जलयुक्त करण्याचे काम चालू असल्याचेही सांगितले आहे. तर शिंदे सरकारने ११ महिन्यात २७ प्रकल्पांना निधी दिल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.
तसेच आता शेतकऱ्यांना एक रूपयात पीकविमा देण्याची पद्धत बदलण्यात येणार आहे. तर मविआवर टीका करताना म्हणाले की, आपण मागील वर्षी एक सरकार पाहिलं ज्या सराकरला निर्णय लकवा होता, निर्णय घ्यायचा नाही हाच मोठा निर्णय त्यांचा होता.
निळवंडे धरणातून पाणी सोडण्याच्या प्रथम चाचणीचा शुभारंभ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते निब्रळ येथे जलपूजन करण्यात आले. यावेळी महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खा. सदाशिव लोखंडे, खा. डॉ. सुजय विखे पाटील, अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर, माजी मंत्री मधुकर पिचड आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील निळवंडे धरण जिल्ह्यातील दुष्काळी व जिरायत भागाला वरदान ठरणार प्रकल्प आहे. या धरण प्रकल्पासाठी एप्रिल 2023 अखेर 5700 कोटी रूपयांचा खर्च झाला आहे. या धरणामुळे अहमदनगरसह नाशिक जिल्ह्यातील सिन्नर भागातील पाणीप्रश्नसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे.
साधारण 1970 च्या सुमारास या प्रकल्पाला मान्यता मिळाली. मात्र सुरवातीच्या दोन गावांनी विरोध दर्शविल्याने हा प्रकल्प रखडला होता मात्र २०२३ मध्ये अखेर पुर्ण झाला. 1993 मध्ये निळवंडे परिसरात धरण प्रकल्प कामाला प्रत्यक्षात सुरवात झाली. या धरण प्रकल्पावर डावा कालवा, उजवा कालवा, उच्चस्तरीय पाईप कालवा व उपसा सिंचन योजना असे चार कालवे आहेत. डावा कालवा हा 85 किलोमीटरचा आहे. तर उजवा कालवा हा 97 किलोमीटरचा आहे.