शरद पवारांनी अर्धेच सांगितले, अर्धे मी योग्य वेळी सांगेन : फडणवीस

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis

मुंबई : अजित पवारांनी आमच्याकडे येण्यापूर्वी पवारसाहेबांशी चर्चा केली होती. शरद पवारांना काही माहिती नव्हते हे बरोबर नाही. त्यांना अनेक गोष्टी माहिती आहेत. भाजप आणि राष्ट्रवादीबाबतची बरीच कल्पना पवारसाहेबांना होती. पवारसाहेबांनी अर्धवट माहिती दिली आहे. उरलेले अर्धे मला माहिती आहे. पडद्यामागे काय घडले हे सर्व मला माहिती आहे, ते मी योग्यवेळी सांगेन, असे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांचे महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. अवघे 80 तास मुख्यमंत्री राहिलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांनी राजीनामा दिल्यानंतर राजीनामा द्यावा लागला होता. आता विरोधी पक्षनेते असलेल्या फडणवीस यांनी लोकसत्ता डॉट कॉमला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्या सत्तानाट्याविषयी वक्तव्ये केली आहेत. 

फडणवीस म्हणाले, ''तिघे एकत्र येत असताना आम्हालाही काही करणे गरजेचे होते. दोन दिवसांपूर्वी अजित पवार आमच्याकडे आले आणि त्यांनी सांगितले की तीन पक्षाचे सरकार स्थापन होऊ शकत नाही. पवारसाहेबांना सांगितल्याचे त्यांनी सांगितले. अनेक आमदारांचेही मत होते. अजित पवारांसोबत गेल्यानंतर आम्ही पत्र दिले आणि राष्ट्रपती राजवट हटविण्यात आली. राजवट हटविल्यानंतर आम्हाला तात्काळ शपथ घ्यावी लागली. आमचा हा गनिमी कावा होता. आपल्याला राजकीय वाळीत टाकत असल्याने आम्ही हा निर्णय घेतला. पण, आमचा गनिमी कावा फसला. पण, तो योग्य होता की नाही हे काळ ठरवेल. 70 टक्के मार्क मिळविलेला पक्ष बाजूला राहिला आणि 40 टक्के मार्क मिळविणारे तीन पक्ष एकत्र आले. अजित पवार यांनी माझ्याकडे येऊन वैयक्तिक कारण सांगितले त्यानंतर जे काही घडले ते सर्वांसमोर आहे. सर्वोच्च न्यायालय असा निकाल देईल, असे आम्हाला अपेक्षित नव्हते.''

आम्ही शिवसेनेसाठी कधीच दरवाजे बंद केले नव्हते. पण, त्यांनी सतत बंड करायचे हे बरोबर नाही. भाजपच्या वरिष्ठ स्तरातून काही जणांना तिकीटे नाकारण्यात आली होती. चंद्रशेखर बावनकुळे यांचे तिकीट नाकारल्याने आम्हाला पूर्व विदर्भात फटका बसला. याबाबत केंद्रीय नेतृत्वच सांगू शकेन, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com