कार्यकर्त्यांचे सूर वेगळे; नेत्यांचा भर मात्र युतीवर

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 18 जानेवारी 2017

फडणवीस - उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा

फडणवीस - उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा
मुंबई - शक्‍ती वाढल्याचे नमूद करत वाढीव, खरे तर अर्ध्या जागांची मागणी करणाऱ्या भाजप नेत्यांना शिवसेनेने पारदर्शीपणाची उदाहरणे शिकवणे सुरू ठेवले आहे. असे असले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज युतीबाबत चर्चा केली. युतीत तणाव निर्माण झाला तरी चर्चा सुरूच ठेवू, असा उभय नेत्यांचा निर्णय झाला आहे. स्थानिक पातळीवर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या चर्चा होत आहेत, त्या आवश्‍यकच आहेत, यातून बाहेर येणाऱ्या सर्व मुद्द्यांवर एकत्रित विचार करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असल्याचे समजते.

शिवसेनेने भाजपची वाढलेली ताकद लक्षात घेत जास्त जागा सोडाव्यात, तसेच मुंबई महानगर आंतरराष्ट्रीय दर्जाचे बनविण्यासाठी पारदर्शी कारभाराची हमी द्यावी, या मुद्द्यांची मात्र आज शिवसेना गोटातून खिल्ली उडविण्यात येत होती. पारदर्शी कारभार हवा असेल तर तो मुंबईत हवाच, परंतु अन्य सर्व संस्थांमध्येही त्याच प्रकारचे वर्तन अपेक्षित असावे, अशी जाहीर भूमिका शिवसेनेचे राज्यसभा सदस्य अनिल देसाई आणि मुंबईतील प्रमुख नेते अनिल परब यांनी घेतली आहे. या संदर्भात पुन्हा एकदा चर्चेला प्रारंभ केव्हा करायचा यावर निर्णय घ्यायचेही ठरले आहे. उद्या पुन्हा एकदा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी बैठक होणार आहे. दोन्ही पक्षांना उभयतांबरोबर जायचे असले, तरी पदरी सर्वाधिक जागा पाडून घ्यायच्या आहेत.

Web Title: devendra fadnavis & uddhav thackeray discussion on alliance