
Devendra Fadnavis : गोडसेच्या औलादींचे काय? खासदार जलील यांचा फडणवीसांना प्रश्न
छत्रपती संभाजीनगर : जातीय तेढ वाढविल्याशिवाय आपली सत्ता येणार नाही, हे भाजपला कळून चुकले आहे. त्यामुळे राज्यासह देशभरात दंगली घडविल्या जात आहेत. सत्तेत येण्यासाठी भाजप मृतदेहांचा कारभार करू शकते! औरंगजेबाच्या औलादी कुठून पैदा झाल्या? असा प्रश्न राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मग गाधींजींची हत्या करणाऱ्या गोडसेचा उदोउदो करणाऱ्या औलादींचे काय? असा प्रश्न खासदार इम्तियाज जलील यांनी फडणवीस यांना केला.
पत्रकार परिषदेत इम्तियाज जलील म्हणाले, की देश स्वातंत्र्य होऊन ७५ वर्षे झाली, पण चारशे वर्षांपूर्वीचा इतिहास उकरून काढण्याचे काम भाजप करत आहे. जातीय तेढ वाढली नाही, तर आपले कर्नाटकप्रमाणे हाल होतील, अशी भाजपला भीती आहे. त्यामुळे राज्यासह इतर ठिकाणी दंगली घडवून आणल्या जात असल्याचा आरोप जलील यांनी केला.
२०१४ पूर्वी कधी औरंगजेबाचे पोस्टर झळकवल्याचे ऐकले आहे का? कुठे गुन्हा दाखल झाला का? मग आताच औरंगजेबाचे पोस्टर कुठून येत आहेत? असा प्रश्न इम्तियाज यांनी केला. टिपू सुलतान यांना नवा खलनायक बनविला जात आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानाच्या प्रतीमध्ये टिपू सुलतान यांचे छायाचित्र आहे. या संविधानातील पान दिल्लीत जाऊन फाडण्याची हिम्मत देवेंद्र फडणवीस दाखविणार आहेत का? त्यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी तारीख जाहीर करावी, असे आव्हान इम्तियाज जलील यांनी दिले.
फोटोंची यादी जाहीर करा
कोणाकोणाचे फोटो मोबाईलवर ठेवायचे त्यांची यादी सरकारने जाहीर करावी. बंदी घातलेल्यांचे फोटो जर मोबाईलमध्ये आढळले तर कारवाई करावी, असे इम्तियाज जलील म्हणाले. दंगली घडत असताना राज्याची गुप्तचर यंत्रणा काय करते? पोलिसांनी घेतलेली बघ्याची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोपही त्यांनी केला.