देवेंद्र फडणवीस बुधवारी येणार सोलापुरात 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 22 June 2020

विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच सोलापुरात 
माजी मुख्यमंत्री फडणवीस हे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सोलापूर जिल्ह्यात आले होते. त्यानंतर अनेक महिन्यांनी ते सोलापुरात येत आहेत. त्यामुळे फडणवीस यांच्या जिल्हा दौऱ्याकडे भाजपच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. 

सोलापूर ः सोलापूर शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने केलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बुधवारी (ता. 24) सोलापुरात येत असल्याची माहिती भाजपचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांनी दिली. 

देशामध्ये राज्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. राज्याच्या काही भागातील यंत्रणा कोलमडून पडली आहे. या पार्श्‍वभूमीवर फडणवीस यांनी राज्याचा दौरा सुरू केला आहे. बुधवारच्या दौऱ्यात ते सोलापूर येथे येऊन त्याठिकाणी प्रशासनाच्या कामाचा आढावा घेणार आहेत. यावेळी अधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेणार आहेत. फिजीकल डिस्टन्सिंगचा विचार करुनच सर्व कार्यक्रमांची रुपरेषा आखली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. 

श्री. फडणवीस हे बुधवारी सकाळी दहा वाजता पुणे येथून निघणार आहेत. दुपारी एक वाजता ते सोलापुरात येतील. दुपारी दीडच्या दरम्यान ते सोलापूर येथील सिव्हील हॉस्पीटलला भेट देणार आहेत. त्यानंतर ते जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन त्यांची भेट घेतील. त्याचबरोबर कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर त्यांच्याकडून ते जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. त्यानंतर दुपारी अडीच वाजता ते मोटारीने मुंबईकडे रवाना होणार आहेत. 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Devendra Fadnavis will arrive in Solapur on Wednesday