मुख्यमंत्री व शरद पवार यांच्यात दावे-प्रतिदावे

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

राज्य सहकारी बॅंकेतील आर्थिक गैरव्यवहार, त्याची सक्तवसुली संचालनालयाकडून होणाऱ्या चौकशीबाबतचे राजकारण सुरू होण्याचे संकेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या शिफारशीवरून अनेक संस्थांना कर्ज दिल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला असतानाच कोणत्याही चौकशीला तयार असल्याचे प्रत्युत्तर पवार यांनी दिले आहे.

मुंबई - राज्य सहकारी बॅंकेतील आर्थिक गैरव्यवहार, त्याची सक्तवसुली संचालनालयाकडून होणाऱ्या चौकशीबाबतचे राजकारण सुरू होण्याचे संकेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या शिफारशीवरून अनेक संस्थांना कर्ज दिल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला असतानाच कोणत्याही चौकशीला तयार असल्याचे प्रत्युत्तर पवार यांनी दिले आहे.

खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, की बॅंकेत वेगवेगळ्या प्रकारचे ठराव केले जायचे, काही कर्ज शरद पवार यांच्या निर्देशानुसार देण्यात आली, काही ठरावात अशा नोंदीही आढळून आल्या आहेत. काही वेळा शरद पवार यांनी पत्रे पाठविली आहेत. त्यामध्ये पवारांनी संबंधित व्यक्तीला कर्ज द्या, असे म्हटले आहे. या सर्व गोष्टींच्या आधारे त्यांचे नाव यामध्ये आले. मुख्यमंत्र्यांच्या या आरोपावर शरद पवार यांनीही उत्तर दिले आहे. ‘मी कधीही कोणत्याही संस्थेला पत्र दिलेले नाही. जर मी पत्र दिले असेल तर त्याची चौकशी व्हावी,’ असे स्पष्ट करत पवार यांनी हे आरोप फेटाळले. 

‘ईडी’चा गुन्हा दाखल झाल्यावरही शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणावर भाष्य केले होते. ‘‘आचारसंहिता लागू झाल्यानंतर मी प्रचारात व्यग्र असणार आहे. त्यामुळे मी चौकशीपासून पळ काढतोय असा अर्थ निघू नये यासाठी ‘ईडी’ कार्यालयात जाण्याचा निर्णय घेतला होता,’’ असे पवार यांनी स्पष्ट केले होते. आता निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी प्रचारात हा मुद्दा आणल्याने निवडकीनंतर प्रकरणाचे राजकारण सुरू होण्याची संकेत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Devendra fadnavisa sharad pawar politics