निवडणुका जिंकल्या म्हणून इतकी मस्ती- मुंडे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 एप्रिल 2017

महाराष्ट्रातही भाजपचेच सरकार आहे. मग एकाच पक्षाची दोन राज्यात वेगवेगळी विचारधारा कशी असू शकते? महाराष्ट्रातल्या भाजपला काय झालंय? संघर्ष यात्रा म्हणजे काय भाजपाचे पेटंट आहे का? आम्ही यात्रा काढली म्हणून पोटदुखी का?

मुंबई - विधानसभेच्या अधिवेशनाच्या काळात राज्यात 100 शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या झाल्या. सरकारला लाज वाटत नाही का? निवडणुका जिंकल्या म्हणून सत्तेची इतकी मस्ती आली आहे का?, असा प्रश्न विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारला विचारला.

आज (बुधवार) विधानपरिषदेत बोलताना मुंडे यांनी कर्जमाफीवरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मुंडे म्हणाले, ''महाराष्ट्रातही भाजपचेच सरकार आहे. मग एकाच पक्षाची दोन राज्यात वेगवेगळी विचारधारा कशी असू शकते? महाराष्ट्रातल्या भाजपला काय झालंय? संघर्ष यात्रा म्हणजे काय भाजपाचे पेटंट आहे का? आम्ही यात्रा काढली म्हणून पोटदुखी का? सरकार संघर्ष यात्रेची नाही, शेतकऱ्यांची चेष्टा करत आहे. भाजपच्या संघर्ष यात्रा किती टनाच्या वातानुकुलित (एसी) गाडीत आणि कोणत्या पंचतारांकित हॉटेलात थांबायच्या हे सांगू का? 30 हजार कोटी कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या आणखी किती आत्महत्येची सरकार वाट पाहात आहे?''

उत्तर प्रदेशात भाजपप्रणित योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने एक लाख रुपयांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी केली आहे. याच मागणीवरून गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षांकडून सरकारकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी करण्यात येत आहे. मात्र, अद्याप सरकारकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. विरोधी पक्षांनी कर्जमाफीसाठी चंद्रपूर ते पनवेल अशी संघर्ष यात्रा काढली होती. या संघर्षयात्रेचा मंगळवारी समारोप झाला.

Web Title: Dhananjay Munde criticize BJP government on farmers loan waiver