सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले : धनंजय मुंडे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जुलै 2018

''असे खोटारडे आणि दळभद्री सरकार मी कधी पाहिले नाही. त्यामुळे सरकारकडून देण्यात येणाऱ्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार असेल''.

- राधाकृष्ण विखे पाटील, विरोधी पक्षनेते, विधानसभा

नागपूर : पीककर्जासाठी आज राज्यातील शेतकरी वणवण फिरत आहे. सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्येत वाढ झाली, अशी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राज्य सरकारवर केली. मराठा, धनगर समाजाला आरक्षणाचे गाजर दाखविले. चार वर्षांनी आता सरकार पूर्ण उघडे पडले आहे. धनगरांना आरक्षण नाही, हे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. तर मराठा आरक्षण देता येत नसल्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणतात, असा आरोपही धनंजय मुंडेंनी यावेळी केला. 

नागपूर येथे विरोधी पक्षांच्या वतीने संयुक्त पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मुंडे बोलत होते. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह विरोधी पक्षातील अन्य काही नेते उपस्थित होते. मुंडे म्हणाले, यवतमाळ आणि अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा बडगा उगारल्यानंतर हे सरकार जागे झाले. तोपर्यंत मुख्यमंत्री आणि हे सरकार झोपा काढत होते का, हा प्रश्न आम्ही या अधिवेशात सरकारला विचारणार आहोत. तसेच राज्य सरकारने विदर्भात एकतरी उद्योग आणला असता आणि विदर्भातील तरूणांना रोजगार दिला असता तर नक्कीच पुन्हा एकदा पावसाळी अधिवेशन बोलावल्याबद्दल आम्ही सरकारचे अभिनंदन केले असते. 

दरम्यान, असे खोटारडे आणि दळभद्री सरकार मी कधी पाहिले नाही. त्यामुळे सरकारकडून देण्यात येणाऱ्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार असेल, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

Web Title: Dhananjay Munde Criticizes CM Fadnavis Government