Video : धनंजय मुंडे म्हणतात, गड, गादी नि महंतांपेक्षा कोणीही मोठं नाही

राजेंद्र सावंत
Friday, 10 January 2020

मंत्री मुंडे गुरुवारी दुपारी भगवानगडावर आले होते. संत भगवानबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यावर, मंत्री मुंडे यांनी महंत डॉ. नामदेवशास्त्री सानप यांची भेट घेतली. भगवान बाबा व विठ्ठलाची मुर्ती देऊन महंतांनी त्यांचा गौरव केला.

पाथर्डी : "संत भगवान बाबांमध्ये एक पावित्र्य होत. त्या पावित्र्यातूनच बाबांनी भगवानगडाची निर्मिती केली. राजकीय द्वेषातून उद्या कोणी कुठेही गड उभा करील; मात्र हा गड, गादी आणि महंतांपेक्षा कोणीही मोठं नाही,'' असा टोला सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे नाव घेता न लगावला.

हेही वाचा - कुंभार व्यवसायावर "संक्रांत' 

""राजकारण राजकारणाच्या ठिकाणी आणि धर्मकारण धर्मकारणाच्या ठिकाणी चांगलं असतं. मी भक्त म्हणुन येथे आलो. भगवानगड हे शक्तीपीठ आहे. त्यावरून महंतांनी आम्हाला काही मागावं, असं नाही आणि आम्ही ते देण्याएवढे मोठे नाहीत. सेवा म्हणुन करू, ती माझी जबाबदारी असेल,'' असेही ते म्हणाले.

मंत्री मुंडे गुरुवारी दुपारी भगवानगडावर आले होते. संत भगवानबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यावर, मंत्री मुंडे यांनी महंत डॉ. नामदेवशास्त्री सानप यांची भेट घेतली. भगवान बाबा व विठ्ठलाची मुर्ती देऊन महंतांनी त्यांचा गौरव केला. आमदार प्रकाश सोळंकी, आमदार बाळासाहेब आजबे, आमदार संदीप क्षीरसागर, गोविंद घोळवे, ऍड. प्रताप ढाकणे, "राष्ट्रवादी'च्या बीड महिला जिल्हाध्यक्ष रेखा फड, माजी आमदार सुनील धांडे, शिवशंकर राजळे, बाळसाहेब राख, बन्सी आठरे, संभाजी पालवे, आदिनाथ महाराज आंधळे आदी उपस्थित होते. 

munde

भगवानगड (पाथर्डी) : विठ्ठल व भगवानबाबांची मूर्ती देऊन महंत नामदेव शास्त्री महाराज यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे स्वागत केले.  

खऱ्या अर्थाने आज न्याय झाला

मंत्री मुंडे म्हणाले, ""गडाची व त्यावर श्रद्धा असणाऱ्या भक्तांची सेवा करण्याची संधी मंत्रीपदाच्या माध्यमातून मिळाली, हे माझं भाग्यच! मी 2014मध्ये विधान परिषदेतील विरोधी पक्षनेता असताना, भगवानगडावर आलो होतो, तेव्हा काही लोकांनी माझ्या वाहनावर दगड मारले. आज संत भगवानबाबा व महंत नामदेशास्त्री महाराज यांनी खऱ्या अर्थाने न्याय केला, असं म्हणावं लागेल. सुवर्णाक्षरांनी लिहावा, असा आजचा दिवस माझ्यासाठी आहे. मी मंत्री होणार, हे निश्‍चित झाल्यावर गडाचे महंत मुंबई येथील माझ्या निवासस्थानी आले. मंत्री झाल्यावर भगवानगडावर दर्शनासाठी या, अशी आज्ञा केली.'' 

भक्त म्हणुन आलोय

""हा गड संत भगवानबाबांचा आहे. भले काहींनी ठरवलं असेल, की या गडावरून दगड मारावीत. मला बाबांपासून वेगळं करावं; पण मठाधिपती न्यायाचार्य आहेत. मठाधिपतींनी मला न्याय दिला. हा चमत्कार आहे. ही बाबांची शक्ती आहे. गडाचं व आमचं अनेक पिढ्याचं नातं आहे. तीच श्रद्धा व भक्ती घेऊन मी आलोय. मंत्री म्हणून जबाबदारी असली, तरी एक भक्त म्हणुन मी आलोय,'' असे मंत्री मुंडे म्हणाले. 

हेही पाहा - राहुरी तालुक्‍यात चोरांचा धुमाकूळ 

क्रेनच्या साहाय्याने घातला हार

भगवानगडावर मंत्री मुंडे यांचा गौरव करण्यासाठी भक्तांनी आणलेला प्रचंड मोठा पुष्पहार अक्षरक्ष: क्रेनच्या साहाय्याने मुंडे यांना घालावा लागला. राज्यभरातून आलेल्या भगवानबाबांच्या भक्तांनी मुंडे यांचे स्वागत "एकच तुफान, जय भगवान' अशा घोषणा देत केले. भगवान बाबा की जय, या घोषणांनी गड दुमदुमून गेला होता. संत भगवानगडावर भक्तांसाठी प्रसादाची सोय करण्यात आली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhananjay Munde says Nobody is bigger than Gad, Gaddi and Mahants marathi news