धारावीला आता 'अच्छे दिन'

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 फेब्रुवारी 2019

"स्लमडॉग मिलेनियर' चित्रपटामुळे धारावीला आंतरराष्ट्रीय "ग्लॅमर' मिळाले आहे. म्हणूनच धारावीतील लोकजीवन अनुभण्यासाठी एक दिवस मुक्काम केला. 

- ग्लॅरिडा मॅक्किंझाव्हिया, पर्यटक, न्यूझीलंड. 

मुंबई : कुंभारवाडा, चामड्याच्या वस्तू, जरीकाम, खाद्यपदार्थ आणि अनेक लघू व कुटीरोद्योग चालणारी धारावी झोपडपट्टी आता पर्यटनस्थळ बनली आहे. धारावी जवळून अनुभण्यासाठी अनेक परदेशी पर्यटक येथील झोपड्यांमध्ये एखाद्या रात्रीचा मुक्काम करत आहेत. झोपडीच्या मालकाला एका रात्रीसाठी पर्यटकामागे दोन हजार रुपये मिळत असल्याने धारावीला पर्यटनातून "अच्छे दिन' दिसू लागले आहेत. 

कॅनडा, ब्रिटन, इटली, न्यूझीलंड आदी देशांतील पर्यटकांची धारावीत ये-जा पाहायला मिळत आहे. आशियातील पहिल्या क्रमांकाची झोपडपट्टी अशी एकेकाळी ओळख असलेल्या धारावीत एका आंतरराष्ट्रीय पर्यटन कंपनीने पर्यटनाचा "फंडा' सुरू केला आहे. त्यामुळे मुंबई पाहण्यासाठी आलेल्या परदेशी पर्यटकांची पावले धारावीकडे वळत आहेत. येथील जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याच्या हेतूने धारावीतील झोपडीत राहण्यासाठी दिवसाला दोन हजार रुपये अथवा त्याहून अधिक रक्कम मोजतात, असे सांगण्यात आले. 

झोपडीत मुक्काम करण्याची इच्छा असलेल्या चार पर्यटकांचा गट केला जातो. पर्यटन कंपनीची मान्यता असलेल्या धारावीतील झोपडीधारकांना तसे कळवले जाते. त्यानुसार हे परदेशी पर्यटक त्यांच्या झोपड्यांमध्ये रात्र घालवतात. त्या झोपडीधारकाचे कुटुंब त्या रात्री शेजारी अथवा नातेवाइकांकडे राहतात. "अतिथी देवो भव' या उक्तीनुसार आम्ही परदेशी पाहुण्यांचे आदरातिथ्य करतो. त्यांना स्वयंपाकघर आणि स्नानगृह वापरण्याची मुभा देतो, असे स्थानिक रहिवासी चिन्नप्पा मुदलीहरन यांनी सांगितले. 

परदेशांतही गरिबी आणि झोपडपट्ट्या आहेत. तेथील परिस्थिती आणि धारावी यांची तुलना करण्यासाठी पर्यटक हा अनुभव घेतात. येथील गल्लीबोळ आणि झोपड्यांत चालणारे उद्योग-व्यवसाय पाहण्यासाठी ते उत्सुक असतात. कुंभारवाडा, चामड्याचे कारखाने, धोबीघाट, इडली गल्लीला भेट देण्यास त्यांची अधिक पसंती असते. परदेशी पर्यटकांची ये-जा आता स्थानिकांच्या अंगवळणी पडू लागली आहे. ते आपल्या तोडक्‍यामोडक्‍या इंग्रजीत पर्यटकांच्या प्रश्‍नांना उत्तरेही देतात. 

झोपडीत रात्र घालवणाऱ्या पर्यटकांची सुरक्षेची जबाबदारी संबंधित कंपन्या घेतात. त्या झोपडीबाहेर सुरक्षारक्षक तैनात असतो. स्थानिक पोलिसांनाही कळवले जाते. 

- चिन्नपा मुदलीहरन, रहिवासी, धारावी 

Web Title: Dharavi now has a Acche Din