‘भाषेतले उरणे’...

Marathi
Marathi

आपण मराठी भाषा निवडली नाही, तर आपला मराठीत जन्म झाला. आपल्या जन्माआधीही मराठी होती. आपण मराठी शिकून ‘मराठी’ झालो. आपण मराठी मराठीतून शिकलो. आपल्या शाळांमध्ये ‘मराठी’ हा विषय असतो! मराठी भाषा आपण मराठीतून शिकतो. मराठीच आपल्याला मराठी शिकवते. मराठीच्या पेपरात चोख उत्तरे दिल्यास आपल्याला मराठीतून ‘शंभर’ मार्क ‘पडतात’. म्हणजे ‘शंभर’ नावाचा मराठी आकडा आपल्यातल्या ‘मराठी’ विद्यार्थ्यावर धाडकन ‘पडतो’. धाडकन पडलेल्या शंभर आकड्याने, आपले शंभर वेगवेगळे तुकडे होतात. त्यातला प्रत्येक तुकडा शत प्रतिशत मराठी असतो. आणि मिळालेले शंभर मार्कही, प्रत्येक तुकड्याच्या अस्सल मराठी असण्याला मिळतात. प्रश्‍न मराठी चोख असण्याचा नाहीये. कारण एसएससी बोर्डात, मराठीत जरी कमी मार्क पडले, तरी आपले मराठी असणे कमी होत नाही. प्रश्‍न तुकड्यांचा नाहीये, प्रश्‍न दोन तुकड्यांच्या मधे काय ‘उरते’ ह्याचा आहे.

तर, हा उरण्याविषयी बोलुयात! आपण जन्म घ्यायच्या आधी मराठी होती, आणि आपण मेल्यानंतरही मराठी राहणार. काय उरले? क्षेम. काहीच नाही. किंवा ‘काहीच नाही’ नावाचे काहीतरी उरले. जिथे ‘अस्सल मराठी’ आहे, तिथे ह्या उरल्या सुरल्याचे काय काम? तिथे तर सगळे काम झालेलेच आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पऽऽऽऽऽ अऽऽऽऽऽ अंऽऽऽऽऽ मSSSS अSSSS … श्‍या! सारखे उरतेय. काही राहात नाहीये. भाषा उरून पुरतेय. चूक! भाषा पुरून उरतेय! प्रश्‍न नक्की काय आहे, हे सांगायचे राहातेय. अंऽऽऽऽऽ पश अंऽऽऽऽऽ ललललल कककककात येयेयेयेयेयेत नाहीये. चुका चुका चुका होतायत. चुका चोतायत. चूप चुका चोतायत. बोबडी वळण्याविषयी लिहिताना, बोब(हात)डी वळतीये.
हं. आता कळलं. प्रश्‍न (मराठी) चुकण्याचा आहे. ‘चुकीची मराठी’ म्हणजे, बरोबर आणि चुकीची मराठी नव्हे. प्रश्‍न ‘चुकलेल्या मराठीचा’/‘मराठी चुकल्याचा’ नाहीये. प्रश्‍न चुकण्याचा आहे. चुकलो, (म्हणजे - बोबोबोबो चुचुचुचुचु), तर ते (मराठी/काहीही) असते वा नसते? म्हणजे खरंतर ती ‘भाषा’ असते वा नसते. आणि जर ती भाषा नसते, तर मग हे (बोबडी वळणे) काय असते?
आणि ‘लिहिताना’ बोबडी वळणे म्हणजे काय असते?

मराठीतून मराठी शिकताना, मराठीतून अस्सल मराठी बनताना, आपण ‘आपण’ राहातच नाही. आपण, ‘दहावीत किती टक्के?’ ह्या प्रश्‍नाचे एकच शंभर नंबरी उत्तर होऊन राहातो. मार्क कमी पडले, तरी ‘दहावीत किती पडले’ हा प्रश्‍न ज्या व्यवस्थेतून येते, त्या व्यवस्थेला, ‘नापास’ (म्हणजे - ‘पस्तीसच्या खाली’) असे उतर दिले, तरीही आपले मार्क शंभरच असतात. कारण मार्क कमी असले म्हणून काय झाले? प्रश्‍न ज्या व्यवस्थेतून विचारला आहे, त्याचे उत्तर त्या व्यवस्थेतूनच दिलेले आहे. आपण शंभर असतो नं! ‘…’ आपण एक आकडा असतो ‘…’ आपण ‘आपण’ नसतो.

वर जे ‘…’ आहे, त्यात आपला आपलेपणा बाहेर येतो. भाषाव्यवस्थेत अर्थ आहे तसा अनर्थही आहे आणि निरर्थही आहे. पण
भाषाव्यवस्थेमध्ये काहीतरी ‘उरणं’ही आहे.
‘उरणं’ न+असतं. ‘उरणं’ नसून असतं.
भाषा पुरून कोण उरते? भाषा पुरून आपण उरतो!
आपण भाषाव्यवस्थेच्या सीमारेषेवर असतो....
(धर्मकीर्ती सुमंत यांना २०१२मध्ये त्यांच्या ‘पाणी चारू,आरो इत्यादी’ या नाटकासाठी साहित्य अकादमीचा युवा साहित्यिक पुरस्कार मिळाला आहे.)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com