'धोनी-अनटोल्ड'चे मराठीकरण नकोच

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 22 ऑगस्ट 2016

मराठी चित्रपट आणि चित्रपट निर्मात्यांची इतरांकडून होणारी गळचेपी आम्ही सहन करणार नाही. मराठी प्रेक्षकांसाठी मराठी चित्रपटसृष्टी समर्थ आहे. हा चित्रपट मराठीत डब करण्याचा डाव यशस्वी होऊ देणार नाही. प्रसंगी रस्त्यावर उतरू.
- मेघराज राजेभोसले, अध्यक्ष, अ. भा. मराठी चित्रपट महामंडळ

मुंबई : एम. एस. धोनी-अनटोल्ड स्टोरी‘ हा हिंदी चित्रपट मराठीत डब करून प्रदर्शित करण्यास मनसे चित्रपट कर्मचारी सेनेने केलेल्या विरोधाच्या सुरात अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळानेही सूर मिसळला आहे. यासंदर्भात भूमिका मांडण्यासाठी महामंडळाचे शिष्टमंडळ लवकरच सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांचीही भेट घेणार आहे.

तेलगू, तमिळ भाषक हिंदी चित्रपट पाहत नाहीत. त्यामुळे त्यांच्या भाषेत हिंदी चित्रपट डब केले; तर बाब निराळी आहे, पण महाराष्ट्रातील मराठी माणूस मराठीबरोबरच हिंदी चित्रपटही आवडीने पाहतो. त्यामुळे हिंदी चित्रपट मराठीत डब करण्याचे प्रयोजनच न उमगणारे आहे, असे महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले म्हणाले. मराठी चित्रपटसृष्टीसमोर आधीच अनेक समस्या असून त्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: 'Dhoni' s-anatoldace marathikarana

टॅग्स