भाजप पुन्हा नंबर वन

Dhule-Nagar-Municipal-Result
Dhule-Nagar-Municipal-Result

मुंबई - नुकत्याच झालेल्या धुळे आणि नगर महापालिका आणि अन्य नगर परिषदांच्या निवडणुकीत भाजप पुन्हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला. 

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या धुळे आणि नगर महापालिकांचे आज निकाल जाहीर झाले. धुळ्यात भाजपने एकतर्फी वर्चस्व गाजवित स्पष्ट बहुमत मिळविले, तर नगरमध्ये कोणत्याच पक्षाला बहुमत न मिळाल्याने त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. येथे शिवसेना सर्वांत मोठा पक्ष ठरला. 

जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली धुळ्यात लढलेल्या भाजपने ‘फिप्टी प्लस’चा नारा खरा ठरविला. भाजपला ७४ जागांपैकी ५० जागांवर विजय मिळाला. भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे यांच्या लोकसंग्राम पक्षाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले.

‘एमआयएम’ या पक्षाने चार जागा जिंकत धुळ्यात खाते उघडले. भाजपने ईव्हीएममध्ये गैरप्रकार करत आणि गुंडगिरीच्या जोरावर निवडणूक जिंकल्याचा आरोप गोटे यांनी केला आहे.

धुळ्यात भाजपला यश मिळाले तरी नगरमध्ये मात्र एकहाती सत्ता मिळवण्याचे त्यांचे स्वप्न भंगले आहे. येथील महापालिका निवडणुकीत एकूण ६८ जागांपैकी शिवसेनेने सर्वाधिक २४ जागा जिंकत सर्वांत मोठ्या पक्षाचा मान मिळविला. या निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमत न मिळाल्याने नगर महापालिकेत त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे नगर महापालिकेत कोणत्या पक्षाचा महापौर बनणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केलेला श्रीपाद छिंदम या निवडणुकीत विजयी झाल्याने सर्वच जण आश्‍चर्यचकीत झाले आहेत. तो जवळपास दोन हजार मतांनी विजयी झाला. नगरमध्ये भाजप आणि शिवसेना स्वबळावर लढले, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होती. या आघाडीला २३ जागा मिळाल्या आहेत. अपक्ष आणि इतरांना हाताशी धरून ते महापौरपदावर दावा करू शकतात. मात्र, निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजप एकत्र आल्यास आघाडीपासून सत्ता दूरच राहील. २०१७ पासून राज्यातील महापालिका, नगर परिषदा/नगरपंचायती, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांत भाजपने सर्वाधिक जागा जिंकत अव्वल असल्याचे दाखवून दिले होते. 

आज आलेल्या निकालांमध्ये राज्यातील सहा पैकी तीन नगरपालिकांत भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. नगर महापालिका आणि ब्रह्मपुरी, रिसोड व नेर नबापूरमध्ये भाजपची पीछेहाट झाल्याचे दिसून आले. मात्र गेल्या दोन वर्षांत झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक जागा जिंकत पहिला क्रमांक पटकावला आहे.

नगर परिषद/नगरपंचायत
शेंदूर्णी - भाजप - १३, राष्ट्रवादी - ३, काँग्रेस - १, 
लोहा - भाजप - १३, काँग्रेस - ४
नेर नबापूर - भाजप - ००, राष्ट्रवादी - ३, काँग्रेस - ४, शिवसेना - ९
रिसोड - भाजप - ००, राष्ट्रवादी - ००, काँग्रेस -३, शिवसेना - ३, अन्य - १४
मौढा - भाजप - ८, राष्ट्रवादी - ००, काँग्रेस - ५, शिवसेना - २, अपक्ष - २ 
ब्रह्मपुरी - भाजप - ३, काँग्रेस -१०, राष्ट्रवादी - ००, अन्य - ७ 

भाजपने दुर्मागाने मिळवलेले धन म्हणजेच दुर्योधन आणि अनैतिक पद्धतीने चालवलेले शासन म्हणजेच दु:शासन यांच्या माध्यमातून लोकशाहीचे वस्त्रहरण सातत्याने केले आहे. धुळे महापालिकेतील विजय हा भाजपचा नसून साम, दाम, दंड, भेदाचा विजय आहे.
- अशोक चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com