संमेलनाध्यक्षपदासाठी दिब्रिटो आघाडीवर

dib.jpg
dib.jpg

लातूर : आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी चर्चेत असलेल्या मराठवाड्यातील चारही साहित्यिकांनी माघार घेतल्याने नवे संमेलनाध्यक्ष मराठवाड्याबाहेरील असणार, हे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. त्यातच ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे नाव संमेलनाध्यक्षपदासाठी सध्या आघाडीवर आहे. दोन साहित्य परिषदांनी या नावाला पाठींबा दर्शवला आहे. त्यामुळे दिब्रिटो यांनाच हा मान मिळेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मराठवाड्यात होत आहे. त्यामुळे संमेलनाध्यक्ष मराठवाड्यातील असणार, अशी चर्चा गेल्या काही महिन्यांपासून साहित्य वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, कवीवर्य ना. धों. महानोर, साहित्यिक सुधीर रसाळ, साहित्यिक रा. रं. बोराडे ही नावे पुढे आली. यापैकी एका साहित्यिकाला संमेलनाध्यक्ष पदाचा मान मिळणार, असे वाटत असतानाच बोराडे यांनी मराठवाडा साहित्य परिषदेला लेखी, रसाळ आणि महानोर यांनी तोंडी नकार दर्शवला. त्यानंतर आता चपळगावकर यांनीही पत्र पाठवून 'संमेलनाध्यक्षपदासाठी सध्या माझ्या नावाचा विचार करू नका' असे पत्र परिषदेला पाठवले आहे.

रसाळ यांनी ना. सी. फडके हे वयाच्या 40 व्या वर्षी संमेलनाध्यक्ष झाले होते, असे सांगत हे पद ज्येष्ठांऐवजी तरुणांना मिळावे, असे साहित्य महामंडळाला सूचित केले आहे. तर काही साहित्यिकांनी हे पद वेगवेगळ्या धर्मांतील आणि वेगवेगळ्या क्षेत्रांत राहून मराठीची सेवा करणाऱ्या प्रतिभावंतांना मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यामुळे महामंडळाच्या घटक, समाविष्ट, संलग्न संस्था कोणकोणती नावे साहित्य महामंडळाच्या उद्याच्या (ता. २२) बैठकीत ठेवणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

एकमत होणार की निवडणूक? - साहित्य महामंडळाच्या घटक, समाविष्ट, संलग्न संस्थांकडून संमेलनाध्यक्षपदासाठी नावे मागवली जातात. बैठकीच्या आधीच ह नावे महामंडळाकडे पाठवली जात होती. त्यामुळे त्या नावांवर उलटसुलट चर्चा रंगत होत्या. त्या होऊ नयेत म्हणून साहित्य महामंडळाने यंदा  घटक, समाविष्ट, संलग्न संस्थांकडील नावे महांमडळाच्या बैठकीतच द्यायची, असा निर्णय यंदा घेतला आहे. त्यामुळे वेगवेगळी नावे बैठकीत पुढे येतील. एका नावावर एकमत झाले नाही तर निवडणूक घेण्याचा पर्यायही खुला ठेवण्यात आला आहे. त्यामुळे एकमत होणार की निवडणूक, याचीही अनेकांना उत्सुकता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com