डिझेल आजपासून आणखी स्वस्त

Diesel
Diesel

मुंबई, नाशिक - राज्य सरकारने पेट्रोलपाठोपाठ डिझेलवरील व्हॅटच्या दरात आज कपात केली. त्यामुळे राज्यात उद्यापासून (शनिवार) डिझेल प्रति लिटर 1 रुपया 56 पैशांनी स्वस्त मिळणार आहे. डिझेलबाबत केंद्राच्या कालच्या निर्णयामुळे आजपासून डिझेल अडीच रुपये कमी किमतीत उपलब्ध झाले. या निर्णयामुळे राज्याला 1 हजार 725 कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागले आहे. केंद्र आणि राज्याच्या एकत्रित निर्णयामुळे डिझेलचा दर प्रति लिटर 4 रुपये 6 पैशांनी कमी झाला आहे.

नाशिकमधील महाराष्ट्र पोलिस अकादमीमध्ये आज झालेल्या दीक्षान्त सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या सोहळ्यानंतर पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी डिझेलवरील कर कमी केल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, 'आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये भरमसाठ वाढ झाल्याने पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली. त्यातून नागरिकांना दिलासा मिळावा म्हणून करकपात लागू करण्यात आली आहे.

पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिरावण्याचे नाव घेत नसल्याने सरकारच्या तोंडचे पाणी पळाले होते. या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काल पेट्रोल आणि डिझेलवर आकारल्या जाणाऱ्या उत्पादन शुल्कात प्रतिलिटर दीड रुपयाने कपात केली. तर तेल कंपन्यांनी एक रुपयाची कपात घोषित केली. केंद्राकडून अडीच रुपयांनी दिलासा मिळाल्यानंतर राज्य सरकारने काल पेट्रोलवरील व्हॅटचा दर अडीच रुपयांनी कमी केला. मात्र, डिझेलच्या संदर्भात निर्णय घेतला नव्हता.

राज्यात डिझेलचा सर्वाधिक खप असून डिझेलवरील व्हॅटपासून मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. त्यामुळे राज्य सरकारने आज डिझेलच्या संदर्भात अभ्यास करून डिझेलवर आकारल्या जाणाऱ्या व्हॅटमध्ये प्रति लिटर 1 रुपया 56 पैशांनी कपात केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर वित्त विभागाने आज तशी अधिसूचना जारी केली. त्यानुसार आज मध्यरात्रीपासून डिझेलचा दर 1 रुपया 56 पैशांनी कमी झाला.

राज्य सरकारकडून डिझेलवर अधिसूचित शहरात प्रतिलिटर 24 टक्के अधिक एक रुपया तर गैर अधिसूचित शहरात 21 टक्के अधिक एक रुपया असा व्हॅट आकारला जातो. सरकारने एक रुपया अधिभार हटविताना "व्हॅट'मधून 56 पैसे कमी केले आहेत.

डिझेलचे गणित
1100 कोटी लिटर - राज्यातील खप
13165 कोटी - 2017-18 मधील महसूल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com