डिझेलचा चटका...

संजय मिस्कीन
गुरुवार, 24 मे 2018

मुंबई - पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीने सामान्य ग्राहक संतप्त झालेला असला, तरी या दरवाढीने शेतकरी आणि माल वाहतूकदारांची "दुष्काळात तेरावा...' अशी अवस्था झाली आहे. गेल्या वर्षभरात डिझेलच्या दरामध्ये तब्बल 13 रुपयांची वाढ झाल्याने शेतकऱ्यांना ट्रॅक्‍टरची मशागत महाग झाली आहे, तर शेतीमाल वाहतुकीचाही दर वाढल्याने "इकडे आड तिकडे विहीर' या कात्रीत बळिराजा होरपळत आहे.

ऐन पेरणीपूर्वीचा हंगाम सध्या सुरू आहे, त्यासाठी उन्हाळ्यात शेतीची नांगरट व कोळपणी करण्यात शेतकरी गुंतला आहे. तब्बल 80 टक्‍के शेतकरी सध्या ट्रॅक्‍टरचा वापर मशागतीसाठी करतात. गेल्या वर्षी एका तासाला 400 रुपये असलेला ट्रॅक्‍टर नांगरणीचा दर यंदा 500 रुपये इतका झाला आहे. साधारणतः एक एकर नांगरणीला तीन ते चार तास लागतात. त्यामुळे, एका एकराचा खर्च डिझेल दरवाढीने 1500 ते 2000 रुपये इतका झाला आहे. त्यातच ऐन उन्हाळ्यात शेतकरी साठवलेला माल बाजारात आणतात. मात्र, मालवाहतूकदारांचेही वाहतुकीचे दर वाढल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. नांगरणी व कोळपणी करण्यासाठी शेतकऱ्याला गेल्या वर्षीपेक्षा 2200 ते 2600 रुपये इतका अधिकचा भार उचलावा लागत आहे.

मालवाहतूकदारांनाही या दैनंदिन दरवाढीचा जबरदस्त फटका बसला आहे. तीन महिन्यांपूर्वी असलेल्या डिझेलच्या दरानुसार ज्या मालवाहतूकदारांनी तीन अथवा त्यापेक्षा अधिक महिन्यांचे करार केले, त्यांना आता डिझेल दरवाढीने नुकसानाचा सामना करावा लागत आहे. यामध्ये ट्रक, कंपन्यांमध्ये करार केलेले टेम्पो, कंत्राटदारांकडील ट्रॅक्‍टर, डंपर यांचा समावेश आहे.

देशभरात सुमारे दोन दोन हजार किलोमीटरची मालवाहतूक करणारे शेकडो ट्रक आहेत. त्यांना भारताच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकाला जाण्यासाठी पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी लागतो. या मालवाहतुकीचा दर पंधरा दिवसांच्या डिझेलनुसार ठरला असेल, तर त्यांना रोजच्या दरवाढीने पाच ते सात हजार रुपयांपर्यंतचा फटका बसला आहे.

ट्रॅक्‍टर नांगरणीचा दर
- गेल्या वर्षी एका तासाला 400 रुपये
- यंदा 500 रुपये
- एका एकराचा खर्च आता 1500 ते 2000 हजार रुपये

- करार केलेले वाहतूकदार अडचणीत
- ट्रॅक्‍टर मशागतीचा दर वाढला
- वर्षभरात 13 रुपयांची डिझेल दरवाढ
- एकरी 2200 रुपये खर्चाने बळिराजा हवालदिल

Web Title: diesel rate increase