
Samruddhi Expressway : समृद्धी महामार्ग बनवताना अडचणी आल्या, त्यावर कशी मात केली? फडणवीसांनी सविस्तर सांगितलं
समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. शिर्डी ते भरवीर या ८० किमी महामार्गाचे आज लोकार्पण करण्यात आले. यावेळी ६ ते ८ महिन्यात संपूर्ण मार्ग सुरू होणार असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा आपण सुरू केला आहे. येत्या सहा महिन्यात संपूर्ण महामार्ग सुरू होईल. तिसऱ्या टप्प्याचे जेव्हा लोकार्पण होईल तेव्हा तो थेट मुंबईपर्यंत जाईल, असे फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्याचा विकास करायचा असेल तर राज्याचा मागास भाग मुंबईशी जोडणे आवश्यक होते. अनेक लोकांना हे स्वप्न आणि फक्त घोषणा वायाटायची, पण मला आणि एकनाथ शिंदे यांना विश्वास होता की हे काम रेकॉर्डटाईमवर पूर्ण होईल.
अनेक लोकांनी या महामार्गाला विरोध केला. उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगरच्या सभेत महामार्गाला विरोध केला. शरद पवार यांनी सांगितलं की हे शक्य नाही. ज्या गावात विरोधकांनी सभा घेऊन सांगितलं की हा मार्ग होऊ देणार नाही. त्याच गावात जाऊन एकनाथ शिंदे यांनी लोक जमीन द्यायला तयार आहेत, अशाप्रकारचे पत्र जमा केले. त्या गावात पहिली रजिस्ट्री केली.
देशातील विक्रम आहे, ७०१ किमी जमीन ९ महिन्यात संपादन केली. अधिराऱ्यांनी यात प्रचंड मेहनत केली, असे फडणवीस म्हणाले. यावेळी शेरोशायरी करत फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना देखील टोला लगावला. "अंदाज कुछ और है सोचनेका, मुझे शौक है रास्ता बनाने का", असे फडणवीस म्हणाले.
गेल्या डिसेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डी ते नागपूर दरम्यानच्या 520 किमी लांबीच्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. त्यानंतर आता प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन झाल्यानंतर, नागपूर ते इगतपुरी तालुक्यातील भरवीर गावापर्यंतचा एकूण ६०० किमीचा रस्ता खुला झाला आहे.