बीएड अभ्यासक्रमासाठी बारावीनंतर थेट प्रवेश 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मे 2019

विद्यार्थ्यांना आता बीएडसह बीए आणि बीएस्सी या पदव्याही घेता येणार आहेत. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने पुढील शैक्षणिक वर्षापासून अध्यापक पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा करून त्यात हा बदल केला आहे.

मुंबई - विद्यार्थ्यांना आता बीएडसह बीए आणि बीएस्सी या पदव्याही घेता येणार आहेत. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने पुढील शैक्षणिक वर्षापासून अध्यापक पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा करून त्यात हा बदल केला आहे. पूर्वी पदवीनंतर बीएड अभ्यासक्रमाला प्रवेश मिळत होता. आता बारावीनंतर या एकात्मिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येईल. 

बीएड अभ्यासक्रमातील बदलाबाबतचे राजपत्र प्रसिद्ध झाले असून, येत्या शैक्षणिक वर्षापासून नवीन पद्धतीने प्रवेश दिला जाणार आहे. एमएड अभ्यासक्रम पदवीनंतर तीन वर्षांचा असेल, तर पदवीनंतरचा बीएड अभ्यासक्रम आता एकात्मिक होणार आहे. आगामी शैक्षणिक वर्षापासून (2019-20) या अभ्यासक्रमाची सुरुवात होईल. 

नवीन पद्धतीनुसार बारावीनंतर विद्यार्थ्यांना थेट बीए बीएड आणि बीएस्सी बीएड या अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येईल. या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना अध्यापन कौशल्येही शिकवण्यात येतील. राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषदेमार्फत प्रवेश नियमावली आणि अभ्यासक्रम तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. काही विद्यापीठांमध्ये नियमित महाविद्यालये आणि बीएड महाविद्यालये यांनी एकात्मिक अभ्यासक्रम तयार केल्यास पहिली दोन वर्षे नियमित महाविद्यालय व नंतरची दोन वर्षे बीएड महाविद्यालय असे शिक्षण घेण्याची मुभाही देण्यात आली आहे. 

पाच वर्षांत तीन वेळा बदल 
- 2014 पर्यंत एक वर्षाचा अभ्यासक्रम 
- 2015-16 पासून दोन वर्षांचा अभ्यासक्रम 
- 2019-20 पासून बारावीनंतर चार वर्षांचा अभ्यासक्रम 

Web Title: Direct admission after 12th standard for BEd course

टॅग्स