थेट नगराध्यक्षपदासाठी चुरस

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 20 नोव्हेंबर 2016

राज्यात 147 नगराध्यक्षपदे; उमेदवार एक हजार
मुंबई - राज्यात पहिल्या टप्प्यात मतदान होत असलेल्या 164 नगर परिषदा व नगरपंचायतींच्या सदस्यपदांच्या तीन हजार 706 जागांसाठी एकूण 15 हजार 827 उमेदवार निवडणूक रिंगणात असून, 27 उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत; तर 147 थेट नगराध्यक्षपदांसाठी एक हजार 13 उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी शनिवारी दिली.

सहारिया यांनी सांगितले की, राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार पहिल्या टप्प्यातील 25 जिल्ह्यांमधील 147 नगर परिषदा व 18 नगरपंचायतींच्या (एकूण 165) सार्वत्रिक निवडणुकांसाठी 27 नोव्हेंबर 2016 रोजी मतदान होणार होते; परंतु विविध ठिकाणी 27 उमेदवार बिनविरोध विजयी झाल्याने आणि शिराळा (जि. सांगली) नगरपंचायतीसाठी एकही उमेदवारी अर्ज आला नसल्याने आता 164 नगर परिषदा व नगरपंचायतींच्या तीन हजार 706 जागांसाठी प्रत्यक्ष मतदान होईल. सदस्यपदांसाठी दाखल झालेल्या एकूण 24 हजार 191पैकी 20 हजार 716 उमेदवारी अर्ज वैध ठरले होते. त्यातील चार हजार 889 उमेदवारांनी माघार घेतल्याने प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात 15 हजार 827 उमेदवार आहेत.

सदस्यपदाबरोबरच 147 थेट नगराध्यक्षपदांसाठी दाखल झालेल्या एकूण दोन हजार 374 पैकी 1 हजार 533 उमेदवारी अर्ज वैध ठरले होते. त्यातील 520 उमेदवारांनी माघार घेतल्याने प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात एक हजार 13 उमेदवार शिल्लक राहिले आहेत. या सर्व ठिकाणी 27 नोव्हेंबरला मतदान व 28 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल, असेही सहारिया यांनी सांगितले.

दृष्टिक्षेपात निवडणूक
164 नगर परिषदा व नगरपंचायतींसाठी मतदान
सदस्यपदांच्या 3 हजार 706 जागांसाठी लढत
सदस्यपदांसाठी 15 हजार 827 उमेदवार रिंगणात
विविध ठिकाणी 27 उमेदवार बिनविरोध
147 थेट नगराध्यक्षपदांसाठी लढत
थेट नगराध्यक्षपदासाठी 1 हजार 13 उमेदवार रिंगणात

Web Title: Direct competition for municipal mayor