बसस्थानकांवर अपंगांची फरपट 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

व्हिलचेअर नसल्याने प्रवाशांना त्रास; अधिनियमांची पायमल्ली 

मुंबई : राज्यातील एसटीच्या आगार, बसस्थानकांवर अपंगांसाठी व्हिलचेअर नसल्याने एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. अपंग व्यक्तींना समान संधी हक्कांचे संरक्षण आणि पूर्ण सहभाग अधिनियम 1995 अंतर्गत व्हिलचेअरची सुविधा देणे बंधनकारक आहे; मात्र एसटीने आदेश दिल्यानंतर अपंगांसाठी सुविधा मिळत नसल्याचे प्रवाशांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.

राज्यातील प्रवासी वाहतूक सेवेत अपंगांसाठी व्हिलचेअर उपलब्ध करून दिल्या जातात. विमानतळ, रेल्वेस्थानके या ठिकाणी अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा दिल्या जातात; मात्र एसटीच्या बसस्थानक आणि आगारांमध्ये अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी कोणतीही सुविधा नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अपंगांना समान अधिकार मिळवून देणाऱ्या अधिनियम 1995 अंतर्गत एसटीच्या बसस्थानकांवरसुद्धा ही सुविधा उपलब्ध करण्याचे आदेश एसटीने 7 सप्टेंबर रोजी दिले होते; मात्र अद्यापही स्थानकांवर अपंगांना आवश्‍यक सुविधा देण्यात येत नाहीत. परिणामी अपंगांना इतर प्रवाशांच्या आधाराने एसटीचा प्रवास करावा लागतो आहे.

एसटीचे सर्व आगार मुख्यालयातील बस स्थानके, महत्त्वाची तीर्थक्षेत्र, पर्यटन, क्षेत्रातील बसस्थानकांवर रेडक्रॉस, रोटरी, लायन्स क्‍लब अशा सामाजिक संस्थांशी पत्रव्यवहार करून व्हिलचेअर उपलब्ध करून घेण्याच्या सूचना एसटी प्रशासनाने राज्यातील विभाग नियंत्रकांना दिले असताना, अपंगांसाठी राज्यातील विभाग नियंत्रक अद्यापही गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. 

एसटी महामंडळात एकीकडे कोटी रुपयांचे प्रकल्प, कंत्राट सुरू असताना, अपंगांसाठी साध्या व्हिलचेअर घेण्यासाठी निधी उपलब्ध नसणे हा चिंतेचा विषय आहे. यामुळे अपंग प्रवाशांना नाहक त्रास होत आहे. 
- ऍड. विवेक ठाकरे, सामाजिक कार्यकर्ते 

अपंगांना बसस्थानकांवर सुविधा देण्यासाठी एसटीने यापूर्वीच विभाग नियंत्रकांना आदेश दिले आहेत. काही ठिकाणी सामाजिक संस्थांनी मदत केली आहे. ज्या ठिकाणी अद्याप मदत झाली नसेल, त्याचा आढवा घेऊन या संदर्भात सकारात्मक निर्णय घेतला जाईल. 
- राहुल तोरो, महाव्यवस्थापक, एसटी वाहतूक 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Disability report on bus stops