वरकमाई रोडावण्याची मंत्रालयात चर्चा 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 10 नोव्हेंबर 2016

मुंबई - पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून ताबडतोब रद्द झाल्याची चर्चा मंत्रालयात दिवसभर रंगली आहे. आपली कामे करून घेण्यासाठी टेबलाखालून लक्ष्मीदर्शन करणारे ठेकेदार, वरकमाईसाठी आशाळभूतपणे वाट पाहणारे अधिकारी-कर्मचारी आणि सरकारी दरबारी चकरा मारून कामे करून घेणारे दलाल यांचे चेहरे मात्र साफ उतरले आहेत. मंत्रालय परिसर आणि नरिमन पॉइंट येथे असणारी हॉटेल्सचे यापुढे व्यवहार मंदावणार असल्याचीही चर्चा मंत्रालयात रंगली आहे. 

सरकारी अधिकारी, मंत्री यांच्याशी सलगी करून कामे करून घेणारे दलाल मंत्रालयात कामांचा पाठपुरावा करतात. वेळप्रसंगी नरिमन पॉइंट येथील हॉटेलस्‌मध्ये उतरतात. तसेच आमदार निवासातही त्यांचा डेरा असतो. मात्र, अचानक पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर या सर्वांचे धाबे दणाणले आहेत. बहुतेक सर्व व्यवहार हे तोंडी आणि रोख रकमेच्या माध्यमातून केले जातात. यामध्ये अधिकारी, मंत्री, ठेकेदार, दलाल यांचा संबंध येत असतो. यामुळे आता या सर्वांच्या चेहऱ्यावर आट्या उमटल्या आहेत. काही कामांचा व्यवहार नेमका कसा निपटायचा, याची चिंता यांना लागली आहे. पुढे नेमके काही होईल, हे आता काहीच सांगता येत नाही. त्यामुळे दबक्‍या आवाजात केवळ चर्चा सुरू आहे. मंत्री आस्थापनावरील अधिकारी, ओएसडी, पीएस, शिपाई यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी-कर्मचारी यांच्यात ही चर्चा रंगली आहे. या चर्चेत वरकमाई रोडावणार याबद्दल चर्चा आहे. 

महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या वतीने काळ्या पैशांबाबत घेतलेल्या निर्णयाचे जोरदार स्वागत केले आहे. भ्रष्टाचाराला नक्‍कीच आळा बसणार असून, महासंघाने "पगारात भागवा' हे अभियान जोमाने सुरू ठेवण्यास अधिक ऊर्जा प्राप्त होईल, असे म्हटले आहे. 

Web Title: Discussion on ministry black income