सोलापूरचे डिसले गुरुजी जगातील 10 शिक्षकांच्या यादीत ;"ग्लोबल टीचर प्राइज'साठी अंतिम फेरीत प्रवेश : मुलींच्या शिक्षणासाठी प्रयत्न 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 22 October 2020

श्री. डिसले यांना शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषा म्हणजे कन्नड भाषेत शिक्षण द्यायचे होते. त्यासाठी त्यांनी स्वतःच कन्नड भाषा शिकून घेतली. त्यांनी मराठी पाठ्यपुस्तकांचे कन्नड भाषांतर केले आणि याच भाषेत विद्यार्थ्यांना ऑडिओ कविता, व्हिडिओ व्याख्याने उपलब्ध करून दिली. यासाठीही त्यांनी क्‍यूआर कोड तयार केले. या सर्व कामामुळे त्यांच्या शाळेला शंभर टक्के विद्यार्थी उपस्थिती व जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट शाळेचा पुरस्कार मिळाला आहे.

सोलापूर ः मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना मान्यता म्हणून जिल्ह्यातील परितेवाडी (ता. माढा) येथील प्राथमिक शाळेचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांचे "ग्लोबल टीचर प्राइज' च्या पहिल्या दहा क्रमांकाच्या अंतिम फेरीत नामांकन झाले आहे. क्‍यूआर कोडच्या माध्यमातून पाठ्यपुस्तक क्रांती घडवून आणल्याबद्दल त्यांनी हे यश प्राप्त झाले आहे. 

रणजितसिंह डिसले परितेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून आले तेव्हा शाळेची इमारत जीर्ण होती. त्यांनी ही परिस्थिती शिक्षणासाठी अनुकूल होईल या पध्दतीने वातावरण बदलवले. विद्यार्थ्यांसाठी स्थानिक भाषेत पाठ्यपुस्तके उपलब्ध आहेत, याची खात्री करण्याचे काम त्यांनी सुरू केले. वर्गातील पाठ्यपुस्तकांचे केवळ विद्यार्थ्यांच्या मातृभाषेत भाषांतर केले नाही, तर विद्यार्थ्यांना ऑडिओ कविता, व्हिडिओ व्याख्याने उपलब्ध करून दिली. तसेच त्याचे क्‍यूआर कोड तयार केले. या शाळेमध्ये त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी मोठे काम केले. त्यांच्या याच कामाचा परिणाम म्हणून गावात होणारे मुलींचे बालविवाह आता पूर्णपणे थांबले आहेत. तसेच शाळेत मुलींची 100 टक्के उपस्थिती आहे. 

क्‍यूआर कोडची ओळख करुन देणारी रणजितसिंह डिसलेंची ही महाराष्ट्रातील पहिली शाळा म्हणून ओळखली जाते. डिसले यांचा हा पथदर्शी प्रकल्प राज्यभर राबविण्याचा विचार शासनाने केला. राज्य मंत्रालयाने 2017 मध्ये सर्व ग्रेडसाठी राज्यभर पाठ्यपुस्तांमध्ये क्‍यूआर कोडचा समावेश झाला. त्यानंतर 2018 मध्ये केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालयाने सर्व राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (एनसीईआरटी) पाठ्यपुस्तकांमध्ये क्‍यूआर कोडचा समावेश केला.

श्री. डिसले यांना शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषा म्हणजे कन्नड भाषेत शिक्षण द्यायचे होते. त्यासाठी त्यांनी स्वतःच कन्नड भाषा शिकून घेतली. त्यांनी मराठी पाठ्यपुस्तकांचे कन्नड भाषांतर केले आणि याच भाषेत विद्यार्थ्यांना ऑडिओ कविता, व्हिडिओ व्याख्याने उपलब्ध करून दिली. यासाठीही त्यांनी क्‍यूआर कोड तयार केले. या सर्व कामामुळे त्यांच्या शाळेला शंभर टक्के विद्यार्थी उपस्थिती व जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट शाळेचा पुरस्कार मिळाला आहे. त्यांची ही कामगिरी "ग्लोबल टीचर प्राइज'साठी निवडली गेली. या पुरस्कारासाठी जगभरातून 12 हजाराहून अधिक अर्ज आले होते. त्यामध्ये आधी पहिल्या 50 शिक्षकांमध्ये डिसले यांची निवड झाली होती. आता पुरस्काराच्या अंतिम फेरीतील जगातील दहा शिक्षकांमध्ये रणजितसिंह डिसले यांचे नामांकन झाले आहे. युनेस्कोचा "ग्लोबल टीचर प्राइज' हा पुरस्कार शिक्षकांच्या प्रेरणादायक कामगिरीबद्दल दिला जातो. आता या पुरस्कारासाठी असलेल्या नामांकनामध्ये रणजितसिंह डिसले यांचा समावेश झाला आहे. 

संपादन : अरविंद मोटे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Disley Guruji of Solapur in the list of 10 teachers in the world