Vidhan Sabha 2019 : शून्य ताकद असलेल्यांना तीन जागा कशासाठी? काँग्रेसमध्ये कलह पेटला

वृत्तसंस्था
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

महाराष्ट्रात कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीमध्ये समाजवादी पक्षाला सोबत घेण्यावरून कॉंग्रेसमध्ये कलह पेटला आहे. "शून्य ताकद असलेला समाजवादी पक्षाला तीन जागा देऊन स्वतःच्या गळ्यात धोंडा बांधून घेण्याची गरज नाही,' अशा खरमरीत शब्दांत कॉंग्रेसच्या एका गटाने विरोध दर्शविला. पक्षाच्या एका खासदाराने याच मुद्द्यावर सोनिया गांधींना पत्रही लिहिल्याचे समजते.
 

नवी दिल्ली : महाराष्ट्रात कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीमध्ये समाजवादी पक्षाला सोबत घेण्यावरून कॉंग्रेसमध्ये कलह पेटला आहे. "शून्य ताकद असलेला समाजवादी पक्षाला तीन जागा देऊन स्वतःच्या गळ्यात धोंडा बांधून घेण्याची गरज नाही,' अशा खरमरीत शब्दांत कॉंग्रेसच्या एका गटाने विरोध दर्शविला. पक्षाच्या एका खासदाराने याच मुद्द्यावर सोनिया गांधींना पत्रही लिहिल्याचे समजते.

राज्यात समाजवादी पक्षाने गोवंडी, भिवंडी आणि औरंगाबाद अशा तीन जागा कॉंग्रेसकडे मागितल्या असून भायखळा, अकोला आणि नंदुरबार या तीन मतदारसंघांत मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्तावही दिला आहे. भाजप आणि शिवसेनेविरोधात कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रत्येकी 125 जागांवर लढणार असून उर्वरित 38 जागा मित्रपक्षांना सोडण्याची तयारी केली आहे. 

या प्रस्तावाच्या विरोधात सोनिया गांधींना पत्र लिहिणाऱ्या कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले, की समाजवादी पक्षाचे अस्तित्वच महाराष्ट्रात संपले असताना मृतप्राय झालेल्या या पक्षाला संजीवनी देण्याची गरज काय, या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू असीम आझमी यांच्या गोवंडी मतदारसंघामध्ये लोकसभा निवडणुकीत (ईशान्य मुंबई मतदारसंघात) कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवाराला 79 हजार 482 मते मिळाली होती. आणि भाजप-शिवसेनेला 66 हजार 231 मते मिळाली होती.

भिवंडीमध्ये त्याचप्रमाणे औरंगाबाद विधानसभा मतदारसंघांतही कॉंग्रेसच्या उमेदवारांनाच आघाडी मिळाली होती. हीच आघाडी भायखळा, अकोला आणि नंदुरबारमध्येही होती. असे असताना तीन जागा सोडून समाजवादी पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी कॉंग्रेसने प्रयत्न करायचे आणि मैत्रीपूर्ण लढतीच्या नावाखाली उर्वरित तीन जागांवर या पक्षाने कॉंग्रेसचे उमेदवार पाडायचे, हा कोणता व्यवहार आहे, असा सवाल या नेत्याने केला. 

समाजवादी पक्षाला जागा सोडण्याची तयारी दर्शविणाऱ्या प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, मुंबई प्रदेश कॉंग्रेसचे कार्यवाहक अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्या भूमिकेवरही या नेत्याने नाराजी व्यक्त केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dispute in congress party due to seat sharing with samajwadi party in maharashtra election