
राज्याचा मुख्यमंत्री कोण? यासाठी मुंबईपाठोपाठ शिवसेनेकडून आता ठाण्यातदेखील पोस्टरबाजी सुरू झाली आहे.
ठाणे : राज्याचा मुख्यमंत्री कोण? यासाठी मुंबईपाठोपाठ शिवसेनेकडून आता ठाण्यातदेखील पोस्टरबाजी सुरू झाली आहे. मुंबईत शिवसेनेकडून आदित्य ठाकरे आणि भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांच्या नावांची मुख्यमंत्री म्हणून पोस्टरबाजी बघितली होती. त्यानंतर आता शिवसेनेचे ठाण्यातील महत्त्वाकांक्षी नेते एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी "एकनाथ शिंदेच राज्याचे मुख्यमंत्री' अशी पोस्टरबाजी केल्याने शिवसेनेतच आता दुफळी माजण्याची चिन्हे दिसत आहेत.
निकालाच्या आठवडाभरानंतरही शिवसेना-भाजपचा सत्तास्थापनेचा तिढा अजूनही सुटलेला दिसत नाही. दोन्ही पक्ष मुख्यमंत्रिपदावर अडून बसले आहेत. त्यामुळे सत्तास्थापनेचा पेच सुटणे कठीण होत चालले आहे. मात्र, या सर्व घडामोडींवर आता एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा मुंबई मराठी वाहतूक व्यापार सेना संघटनेचे अध्यक्ष अशोक पाटील यांनी पोस्टरबाजी करून व्यक्त केली आहे.
ठाण्यातील कोलबाड परिसरात शिंदे यांच्या नावाचे हे फलक लागले आहेत. आमच्या ठाण्याचे लाडके ढाण्या वाघ एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होवोत, हीच आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना' असा आशय असलेले फलक ठाण्यात लागल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्री कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, ठाण्यातील या फलकबाजीमुळे राजकीय वर्तुळात मात्र खळबळ उडाली आहे; तर दुसरीकडे शिवसेनेतच दोन गट पडल्याचे दिसून येत आहे.