वाद संमेलनाचा : विचारांचा काळोख 

marathi_sahitya_sammelan
marathi_sahitya_sammelan

सकाळची भूमिका -
विचारांचा काळोख

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या यजमानांनी केलेल्या कृतीमुळे अवघ्या मराठी संस्कृतीची मान खाली गेली आहे. नयनतारा सहगल यांनी संमेलनाच्या उद्‌घाटनाला येऊ नये, म्हणून गेले काही दिवस यवतमाळमध्ये चालविलेला खटाटोप हा विचार स्वातंत्र्याचा संकोच आहे. सहगल यांचे दरवाजे बंद करून कोणत्या साहित्यिक विचारांची कवाडे यजमान संस्था आणि आयोजकांनी उघडली, हे महाराष्ट्राला समजलेच पाहिजे.

व्यक्तिस्वातंत्र्य आणि विचारस्वातंत्र्याला काडीची किंमत न देणाऱ्या झुंडींच्या हाती मराठी साहित्य आणि संस्कृती सुरक्षित नाही. साहित्यिकांच्या विचारांच्या मशाली पेटवून मनामनात नवचेतनांचे उजेड पाडण्याचे संमेलनाचे मुख्य काम. सहगल यांना नाकारून संयोजकांनी आपण स्वतः अंधारात आहोतच; वेळप्रसंगी अवघ्या महाराष्ट्राच्या साहित्य-संस्कृतीलाही अंधारात ढकलू, असाच संदेश दिला आहे. हा संदेश योग्य नाही. वर्तमान आणि भविष्याला सुयोग्य दिशा देणारा तर अजिबात नाही. समतेच्या विचारांच्या महाराष्ट्र भूमीत तो टिकणाराही नाही, हे निश्‍चित.

निमंत्रणवापसीच्या नामुष्कीवर सर्वंच स्तरांतून नाराजी
यवतमाळ येथे 11 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या 92 व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन ज्येष्ठ भारतीय लेखिका नयनतारा सहगल यांच्या हस्ते होणार होते; पण कार्यक्रमात गोंधळ होण्याच्या भीतीने स्थानिक आयोजकांनी सहगल यांना दिलेले निमंत्रण परत घेतले. याचा निषेध सर्वंच स्तरांतून होत आहे. यासंदर्भात राज्यभरातून साहित्यवर्तुळातून उमटलेल्या प्रतिक्रिया.

दक्षिणायन (महाराष्ट्र)तर्फे निषेध करून साहित्यिक डॉ. प्रमोद मुनघाटे म्हणाले की, हा सहगल यांचाच नव्हे; तर समग्र लेखकांचाच अपमान आहे. असहिष्णुता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या प्रश्नावरून त्यांनी त्यांना मिळालेले शासकीय पुरस्कार परत केले होते. या पार्श्वभूमीवर सहगल यांना दिलेले निमंत्रण परत घेणे हा लेखकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आघात आहे.

नयनतारा सहगल यांना दिलेले निमंत्रण मागे घेण्याचा प्रकार दुर्दैवी आहे. सहगल या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर या संमेलनात बोलतील, म्हणून हे झाले, अशा बातम्या येत आहेत. तसे असेल तर ते धक्कादायक आहे. अशाच संमेलनात यापूर्वी दुर्गा भागवत यांनी आणीबाणीच्या विरोधात आवाज उठवला होता. तीच हिंमत यवतमाळच्या आयोजकांनी दाखवावयास हवी.
- ज्येष्ठ साहित्यिक गणेश देवी

निमंत्रण रद्द करणे चांगले नाही. यामुळे एका मोठ्या लेखिकेचा अपमान झाला आहे.
- ज्येष्ठ नाटककार प्रा. महेश एलकुंचवार

हा तमाम साहित्यिकांचा घोर अपमान आहे, असे म्हटले आहे. जर तुम्ही एकदा निमंत्रण दिले तर पाहुण्यांचा सन्मानच करायला पाहिजे होता; परंतु निमंत्रण रद्द करून यजमान संस्थेने अपमान केला आहे. सर्व साहित्यिकांनी या घटनेचा निषेधच करावा.
- साहित्यिक प्रा. दिलीप अलोणे

विरोधाच्या नावाखाली उद्‌घाटक म्हणून दिलेले निमंत्रण मागे घेणे हे चुकीचे आहे. मुळातच, साहित्याला कुठल्याही भाषेचा अडसर नसतो. जगातील सर्व साहित्य हे एकमेकांना जोडलेले आहे. केवळ राजकारणामुळे अथवा कुणाच्या तरी दबावामुळे साहित्यिकाला उद्‌घाटक म्हणून नाकारणे, हे दुर्देवी आहे. त्यामुळे साहित्यातील वातावरण आणखी गढूळ होणार आहे.
- ऐश्‍वर्य पाटेकर (साहित्यिक)

प्रसिद्ध इंग्रजी लेखिका नयनतारा सहगल यांना एकदा सन्मानाने निमंत्रण दिल्यानंतर त्यांना पुन्हा कुणाच्यातरी दबावामुळे नाकारणे हे अतिशय दुर्दैवी आहे. यापूर्वी अनेक साहित्यिकांनी या संमेलनाला विरोध केला होता; परंतु काही काळानंतर तेच साहित्यिक या मंचावर सन्मानाने पदे भोगताना दिसत होते. सहगल यांना उद्‌घाटक म्हणून नाकारणे हे चुकीचेच आहे.
- कवी प्रकाश होळकर

अध्यक्षीय निवडणूक रद्द केली असली, तरी संमेलन संस्कृतीतल्या काही प्रवृत्ती कायम आहेत. संमेलनावर येणारा बाह्य शक्तींचा प्रभाव आजही कायम आहे. कुणाच्या तरी दबावाला बळी पडून नयनतारा सहगल यांना उद्‌घाटक म्हणून रद्द करण्याचा निर्णय हा निषेधार्ह आहे. या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मी या संमेलनाला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे.
- साहित्यिक प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडे

नयनतारा सहगल यांना आपण सन्मानाने निमंत्रण दिले होते. एकदा निमंत्रण दिले तर ते नाकारणे हे आपल्या संस्कृतीत नाही.
- लेखिका वेदश्री थिगळे

नयनतारा यांचे आजोबा सीताराम पंडित, शंकर पंडित हे संस्कृत पंडित होते. वेदांचा अर्थ सांगणारे नियतकालिक होते. त्यांनी तुकाराम महाराजांच्या गाथेची चिकित्सक आवृत्ती काढली. त्याला दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे त्यांचे संमेलनाला येणे हे औचित्य होते. यातून त्यांचे महाराष्ट्रावरील ऋण व्यक्त करून पंडितांना अभिवादन करण्याची ही संधी होती. आयोजक त्यात कमी पडले.
- डॉ. सदानंद मोरे, साहित्यिक

नयनतारा सहगल यांना बोलावून निमंत्रण रद्द करणे, हा प्रकार निषेधार्ह आहे. महाराष्ट्र आणि संमेलनाच्या प्रतिष्ठेला हा डाग आहे. मावळता अध्यक्ष म्हणून माझ्या भाषणामधे मी या घटनेचा निषेध करणार आहे. काळ सोकावतो आहे. त्यावर साहित्यिक, कलावंत सर्वांनीच आवाज उठविला पाहिजे.
- लक्ष्मीकांत देशमुख, मावळते संमेलनाध्यक्ष

अरुणा ढेरे या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष होणं जेवढं ऐतिहासिक आणि महत्त्वाचं होतं, तेवढंच नयनतारा सहगल यांचं उद्‌घाटक म्हणून येणंही महत्त्वाचं होतं. त्या याव्यात यासाठी मीदेखील आग्रही होते; पण त्या आता येणार नाहीत, हे फारच धक्कादायक आहे. त्या काही तरी बोलतील म्हणून त्यांना येण्यापासून रोखणे, हा भ्याडपणा आहे आणि महाराष्ट्रासाठी नामुष्की आहे.
- विद्या बाळ, सामाजिक कार्यकर्त्या

नयनतारा सहगल यांना येण्यापासून रोखणे चुकीचे आहे. त्यांच्याबाबत अडचण होती, तर त्यांना निमंत्रित करतानाच त्याचा विचार करायला हवा होता. त्यांनी संमती दिल्यानंतर असे करणे अयोग्य आहे.
- पुष्पा भावे, ज्येष्ठ लेखिका

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे "अच्छे दिन'शी एकात्म नातं राखून आहे. नयनतारा सहगल यांच्या अपमानाचा तीव्र निषेध व्यक्त करते.
- प्रज्ञा दया पवार

नयनतारा सहगल यांचे साहित्य संमेलनातून निमंत्रण मागे घेणे अतिशय चुकीची गोष्ट आहे. हे जे घडते ही लोकशाहीच्या दृष्टीने चांगली लक्षणे नाहीत. आधी उद्‌घाटनासाठी सन्मानाने बोलावणे आणि नंतर निमंत्रण मागे घेऊन त्यांना अपमानित करणे. वरती त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करणे हा प्रकार अयोग्यच.
- सतीश काळसेकर

कुठल्याही साहित्यिकाला उद्‌घाटक म्हणून बोलावून सन्मान द्यायचा आणि नंतर पुन्हा निमंत्रण नाकारायचे, हे निषेधार्ह आहे. मुळात कसदार साहित्य लिहिणाऱ्या कैक साहित्यिकांना अजूनही संमेलनाचे निमंत्रण मिळत नाही, याचाही गांभीर्याने विचार होणे अपेक्षित आहे. 
- कृष्णात खोत 

आजच्या वर्तमानपत्रांमध्ये संमेलनाच्या उद्घाटकांना दिलेले आमंत्रण परत घेतल्याची बातमी वाचून खूप वाईट वाटले. हा संमेलन उद्घाटकांचा आणि त्यात सहभागी होत असलेल्या सगळ्यांचाच अपमान आहे असे वाटते. म्हणूनच संमेलनात सहभागी होण्याचे माझी इच्छा नसल्यामुळे आधीचे संमतीपत्र या इमेलद्वारे मागे घेत आहे. आपल्याला संमेलनाच्या आयोजनासाठी शुभेच्छा.
- अतुल कहाते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com