स्वाभिमानीमध्ये दुफळी

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 11 मे 2017

सदाभाऊंची अवस्था 'इकडे आड, तिकडे विहीर'

सदाभाऊंची अवस्था 'इकडे आड, तिकडे विहीर'
मुंबई - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यातील मतभेदाची दरी दिवसेंदिवस रुंदावत चालली आहे. त्यामुळे संघटनेतील लढवय्या कार्यकर्त्यांत संभ्रमाचे वातावरण आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात प्रस्थापित राजकारणात शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा एल्गार पुकारत केंद्रात आणि राज्यात लोकप्रतिनिधी आणि मंत्रिपद मिळालेल्या संघटनेच्या या दोन लढाऊ नेत्यांत मागील काही महिन्यांपासून संघर्षाच्या चकमकी झडत असून, सध्या ते त्याने टोक गाठले आहे.

संघटनेच्या आंदोलनात मात्र मंत्रिपद स्वीकारल्याने सदाभाऊ खोत यांची अवस्था "इकडे आड, तिकडे विहीर' अशी झाली आहे.

राज्यात शेतकरी संघटनेचे प्रतिनिधित्व म्हणून सदाभाऊ खोत यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विस्तारात सामावून घेतले. सदाभाऊंची पण मंत्रिपदाची इच्छा होती. मात्र, विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे सदाभाऊ सदस्य नसल्याने त्यांना भाजपने विधान परिषदेचे सदस्य केले आणि मंत्रिपदाची शपथ दिली. त्यामुळे सदाभाऊ भाजपच्या जास्त जवळ गेल्याचे चित्र निर्माण झाले. त्यातच मधल्या काळात सदाभाऊ भाजपमध्ये जाणार या बातम्यांना पेव फुटले. तसेच सदाभाऊंनी त्यांच्या चिरंजिवांना पंचायत व जिल्हा परिषद निवडणुकांत उभे केले. त्यात उमेदवारीसाठी आग्रह धरला. मात्र, त्यात त्याचा पराभव झाला. या घटनेनंतर संघटनेत असलेली धुसफूस वेगाने चव्हाट्यावर आली. परिणामी, सदाभाऊ आणि खासदार राजू शेट्टी यांच्यातील संवाद आणखीन कोरडा झाल्याचे समोर आले.

दरम्यानच्या काळात शेतकरी कर्जमाफीवरून खासदार शेट्टींनी आंदोलन केले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला साथ देणाऱ्या या संघटनेने शेतकरी कर्जमाफी, पिकांना हमीभाव आणि समृद्धी महामार्गात जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनी देण्यावरून सरकारच्या विरोधात आंदोलनाची धार तीव्र केली आहे. यास सदाभाऊंनी अधूनमधून उपस्थिती लावली. सरकारचा प्रतिनिधी या नात्याने शेतकऱ्यांचे प्रश्‍न, अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न केला; मात्र, सरकारमध्ये सामील असल्याने त्यांना काही मर्यादा आल्या. परिणामी, त्यांची चळवळीचा नेता म्हणून आणि सरकारचा प्रतिनिधी म्हणून भूमिका थोडी मवाळ राहिल्याचे चित्र निर्माण झाले. यातच शेट्टी यांनी आंदोलनात जान आणली आहे. त्यामुळे सदाभाऊ दुहेरी संकटात सापडले असून, त्यांची अवस्था "इकडे आड, तिकडे विहीर' अशी झाली असल्याचे चित्र आहे.

Web Title: disturbance in swabhimani shetkari sanghatana