तिजोरीच रिकामी तर पैसे देऊ कसे ? : रावते

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

या संपात कॉंग्रेसचा हात आहे. सरकार सातत्याने एसटी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, एसटी कामगार संघटनांनी ऐन दिवाळीत संप पुकारून लोकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यांचा हा निर्णय स्वत:च्याच पायावर कुऱ्हाड मारून घेणारा आहे. 

मुंबई : वेतनवाढीच्या मागणीवरून एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारला आहे. मात्र, सरकारकडे तिजोरीत पैसेच नाहीत, त्यामुळे सातवा वेतन आयोग लागू करू शकत नाही असे राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी म्हटले आहे. 

एसटी कर्मचाऱ्यांचा आजचा संप बेकायदेशीर असल्याचेही रावते यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, की या संपात कॉंग्रेसचा हात आहे. सरकार सातत्याने एसटी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, एसटी कामगार संघटनांनी ऐन दिवाळीत संप पुकारून लोकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यांचा हा निर्णय स्वत:च्याच पायावर कुऱ्हाड मारून घेणारा आहे. 

तत्पूर्वी आज सकाळपासून एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या या संपाचे परिणाम राज्यभरात पाहायला मिळत आहेत. त्यामुळे मुंबई, पुणे, नाशिक, मराठवाडा, विदर्भसह राज्यभरातील बहुतांश ठिकाणी प्रवाशांचे हाल होत आहेत. महाराष्ट्र एसटी कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीतील काही कामगार संघटनांनी या संपातून माघार घेतली होती. मात्र, तरीही कामावर येण्यासाठी निघालेल्या चालक आणि वाहकांना अडवण्यात येत असल्याचा आरोप दिवाकर रावते यांनी केला. तर, अंबाजोगाई आणि बीडमध्ये परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचा पुतळा जाळण्यात आला. त्यामुळे आता शिवसेना यावर काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 

Web Title: Divakar Raote statement on ST employee strike