प्रकाशोत्सवाला उद्यापासून सुरवात 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 ऑक्टोबर 2016

यंदा चार दिवस दिवाळी 
पाडवा आणि भाऊबीज एकाच दिवशी आल्याने 2010 मध्ये तीन दिवस दिवाळी होती. 2011 आणि 2012 मध्ये नरक चतुर्दशी व लक्ष्मीपूजन एकाच दिवशी आल्याने त्या वेळी दिवाळी तीन दिवस होती. मात्र 2013 पासून 2016 पर्यंत दिवाळी सलग चार दिवस आहे, असेही पंचांगकर्ते मोहन दाते यांनी सांगितले.

पुणे : दिवाळीच्या मंगलमय पर्वाला उद्यापासून (ता. 26) सुरवात होत आहे. प्रकाशोत्सवाच्या स्वागताकरिता अवघी पुण्यनगरी नटली असून, घरोघरी आकाशकंदील लावायला सुरवातही झाली आहे. वसुबारस, गुरुद्वादशी, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, आश्‍विन वद्य अमावास्या, कार्तिक शुद्ध प्रतिपदा अर्थातच दिवाळी पाडवा, भाऊबिजेला पणत्या उजळून, फटाके वाजवीत आणि गोडाधोडाचे पदार्थ करून आप्तेष्ट, मित्र, मैत्रिणींसमवेत मौजमजा करीत आनंदोत्सव साजरा करूयात. 

वर्षभरातील सर्व सणांमध्ये दीपावली हा सण सर्वांत मोठा असून, या उत्सवाचे स्वागत करूयात. एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊयात आणि मिष्टान्न भोजनाचा आस्वाद घेत सकारात्मक विचारांच्या उत्सवाच्या आनंदात रममाण होऊयात. दिवाळीच्या निमित्ताने कोणी आजोळी, तर कोणी बाहेरगावी जाण्याचे बेत आखले आहेत, तर कोणी आप्तेष्टांसमवेत किंवा मित्र परिवाराच्या समवेत दिवाळी साजरी करण्याचे योजले आहे, तर कोणी वंचितांसाठी दिवाळी साजरी करण्याच्या तयारीत असल्याचे शहरात फेरफटका मारल्यावर सहजच जाणवते. आश्‍विन महिन्याचा वद्य पक्ष आणि कार्तिक महिन्याच्या शुद्ध पक्षात येणारी ही दिवाळी अनेकांच्या आयुष्यात मंगलप्रसंग घेऊन येवो. तुम्हास ही दिवाळी सुखा-समाधानाची आणि आनंदाची जावो. 26 ऑक्‍टोबर ते 1 नोव्हेंबरपर्यंतच्या दीपोत्सवात आपणही सहभागी होऊयात. 

महत्त्व दिवाळीचे 
आश्‍विन वद्य द्वादशी अर्थात वसुबारसेला (26 ऑक्‍टोबर) सायंकाळी गाय वासरांची पूजा करावी. गोधन म्हणून गाय-वासरांची पूजा करण्याची प्रथा आहे, तर गुरुद्वादशीला (27 ऑक्‍टोबर) दत्त संप्रदायामध्ये विशेष महत्त्व आहे. यंदा कन्यागत पर्व आले असल्याने श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे या निमित्ताने दत्त सांप्रदायिक मंडळी विशेषत्वाने भेट देत आहेत. आश्‍विन वद्य त्रयोदशी अर्थात धनत्रयोदशीला (28 ऑक्‍टोबर) अलंकारांसह कुबेर, विष्णू, लक्ष्मी, योगिनी, गणेश, नाग आदींच्या देवतांच्या प्रतिमांचे प्रतीकात्मक पूजन करतात. आयुर्वेदाचा प्रवर्तक धन्वंतरी हा देवांचा वैद्य असल्याचे मानतात. त्यामुळे धन्वंतरी देवतेच्या मूर्तीचे पूजन करतात. असे पंचांगकर्ते मोहन दाते यांनी सांगितले. 

नरक चतुर्दशीला (29 ऑक्‍टोबर) पहाटे ब्राह्ममुहूर्तावर अभ्यंगस्नान करावे. कुलाचाराप्रमाणे कुलदैवतांचेही पूजन करावे. आश्‍विन वद्य अमावास्येला (30 ऑक्‍टोबर) सायंकाळी सहा वाजून पाच मिनिटे ते रात्री नऊ वाजून दहा मिनिटांपर्यंत तसेच रात्री साडेनऊ ते अकरा वाजेपर्यंत लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त आहे, तर 

कार्तिक शुद्ध प्रतिपदा (बलिप्रतिपदा) अर्थात दिवाळी पाडवा (31 ऑक्‍टोबर) आहे. व्यापारी वर्गाचे नवीन वर्ष या पाडव्यापासून सुरू होते. या निमित्ताने वहीपूजन करण्याची पद्धत आहे. वहीपूजनाचा सुमुहूर्त त्या दिवशी मध्यरात्री एक वाजून 35 मिनिटांपासून ते पहाटे चार वाजेपर्यंत तसेच पहाटे पाच ते सकाळी सव्वाआठ, तसेच सकाळी नऊ वाजून पन्नास मिनीट ते 11 वाजून वीस मिनिटांपर्यंत आहे, तर भाऊबीज 1 नोव्हेंबरला आहे. या दिवशी बहिणीने भावास घरी जेवावयास बोलावून औक्षण करावे, अशी माहिती पंचांगकर्ते दाते यांनी दिली. 

यंदा चार दिवस दिवाळी 
पाडवा आणि भाऊबीज एकाच दिवशी आल्याने 2010 मध्ये तीन दिवस दिवाळी होती. 2011 आणि 2012 मध्ये नरक चतुर्दशी व लक्ष्मीपूजन एकाच दिवशी आल्याने त्या वेळी दिवाळी तीन दिवस होती. मात्र 2013 पासून 2016 पर्यंत दिवाळी सलग चार दिवस आहे, असेही पंचांगकर्ते मोहन दाते यांनी सांगितले.

Web Title: Diwali to start from 26th October 2016