esakal | चला पंढरीला जाऊ...
sakal

बोलून बातमी शोधा

Alandi and Dehu

चला पंढरीला जाऊ...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

आळंदी - रांगोळ्यांच्या पायघड्या...फुलांची आकर्षक तोरणे... ‘माउली’ नामाचा अखंड गजर... आकाशातून पुष्पांचा वर्षाव... अशा उत्साही वातावरणात आजोळघरातील संत ज्ञानेश्‍वर माउलींच्या (Sant Dnyaneshwar Maharaj) चांदीच्या चलपादुका (Paduka) घेऊन एसटीची ‘शिवशाही’ बस आजोळघरापासून पंढरीकडे (Pandharpur) मार्गस्थ होताच आळंदीकरांनी हात उंचावत ‘माउली-माउली’चा गजर करून माउलींना भावपूर्ण निरोप दिला. (Dnyaneshwar and Tukaram maharaj Palkhi Sohala Aashadhi Wari)

संत ज्ञानेश्वर माउलींच्या पादुका गेली सतरा दिवस आजोळघरात होत्या. सोमवारी (ता. १९) आषाढ शुद्ध दशमी आणि मंगळवारी (ता. २०) आषाढी एकादशी असल्याने पंढरपुरात जाण्यासाठी लगबग होती. पहाटे माउलींच्या पादुकांवर पवमान पूजा आणि दुधारती, अभिषेक केला. त्यानंतर मानाचे कीर्तन झाले व लगेचच पंढरीला जाण्याची तयारी सुरू झाली. पादुका घेऊन जाण्यासाठी शिवशाही बस आळंदीतील गरुड कुटुंबीयांनी आकर्षक फुलांनी सजविली. मार्गावर रांगोळ्यांच्या पायघड्या केल्या. रस्त्याच्या दुतर्फा घरातून व गॅलरीतून आळंदीकर माउलींच्या दर्शनासाठी उभे होते. नऊ वाजता कर्णा वाजल्यानंतर पालखी सोहळा मालक राजाभाऊ आरफळकर यांनी पादुका हातात उचलून घेतल्या अन् उपस्थित भाविकांनी ‘पुंडलिका वरदे हरि विठ्ठल’चा जयघोष केला. त्यानंतर ते पादुका घेत बसचे दिशेने निघाले.

हेही वाचा: ‘नॅक’कडून आकारण्यात येणारे मूल्यांकनाचे शुल्क झाले कमी

माउलींच्या चलपादुका आजोळघरातून बाहेर आणल्यानंतर फुलांची सजावट असलेल्या शिवशाहीत स्थानापन्न केल्या. सकाळी सव्वानऊ वाजता शिवशाही आजोळघरापासून पंढरीकडे मार्गस्थ झाली. या वेळी हेलीकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. प्रतिवर्षी लाखोंच्या सोहळ्यातील पायी चालताना येणाऱ्या वारीच्या आनंदास सलग दुसऱ्यांदा मुकावे लागले. या वेळी पालखी सोहळा प्रमुख अॅड. विकास ढगे, प्रमुख विश्वस्त डॉ. अभय टिळक, योगेश देसाई, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, आदी उपस्थित होते.

संत तुकोबांच्या पादुका पंढरपूरला मार्गस्थ

देहू - टाळ-मृदंगाच्या गजरात, ज्ञानोबा-तुकाराम आणि पुंडलिकावरदे हरी विठ्ठलाच्या नामघोषात आषाढी एकादशीसाठी संत तुकाराम महाराजांच्या पादुका देहूतून पंढरपूरकडे सोमवारी (ता. १९) सकाळी आठ वाजता मार्गस्थ झाल्या. फुलांनी सजविलेल्या दोन एसटी बसमध्ये तुकोबांच्या पादुका संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष, विश्‍वस्त आणि सेवेकरी अशा ४० जणांबरोबर पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या. देहूकरांनी रस्त्याच्या कडेला उभे राहून या सोहळ्याला भावपूर्ण निरोप दिला. एसटी बसच्या मागे-पुढे चोख पोलिस बंदोबस्त होता.

कोरोनामुळे राज्य सरकारने पालखी सोहळ्यातील पायी यंदा वारी रद्द केली. त्यामुळे एक जुलैला प्रस्थान झाल्यानंतर तुकोबांच्या पादुका देऊळवाड्यातच मुक्कामी होत्या. पालखी सोहळ्यातील परंपरेनुसार होणारी नित्य पूजा, आरती, कीर्तन आणि जागर गेले १९ दिवस देऊळवाड्यातच संस्थानने घेतले. मंगळवारी (ता. २०) आषाढी एकादशी आहे. ४० जणांच्या उपस्थितीत संस्थानला पंढरपूरकडे जाण्यास सरकारने परवानगी दिली. त्यातही कोरोनाची टेस्ट आणि विविध अटी होत्या. त्यानुसार संस्थानने सर्व तयारी केली.

हेही वाचा: पीएमपीची निवडणूक हरली; पण सत्ताधाऱ्यांवर विरोधकांची कुरघोडी

मुख्य देऊळवाड्यात सोमवारी पहाटे काकडा झाला. संत तुकाराम शिळा मंदिरात संस्थानच्या विश्‍वस्तांतर्फे आरती झाली. भजनी मंडपात संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची पूजा संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे व विश्‍वस्तांच्या हस्ते पूजा झाली. तसेच, विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातही नितीन महाराज मोरे यांनी सपत्निक महापूजा, आरती केली. संपूर्ण देऊळवाड्याला पुणे येथील ताम्हाणे कुटुंबीयांनी आकर्षक फुलांची सजावट केली होती. तुकोबांच्या पादुका डोक्यावर घेऊन मंदिर प्रदक्षिणा झाली. प्रदक्षिणा झाल्यानंतर संत तुकाराम महाराजांच्या पादुका डोक्यावर घेऊन इनामदारवाड्यात आणण्यात आल्या. इनामदारवाड्यात बारामती टेक्स्टाइल मिल्सच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते आरती झाली.

पाऊस झेलत सोपानदेवांच्या पादुका रवाना

सासवड - कऱ्हा नदी व चांबळी नदी यांच्या काठी पावसाची रिमझिम...सोबतच हरिनामाचा गजर... रांगोळ्यांच्या पायघड्या...त्यावरून होणारी पुष्पवृष्टी...वारकरी व भाविकांचा भक्तिरंग...अशा उत्साही वातावरणात संत सोपानदेव महाराजांच्या पादुका पंढरपूरकडे आषाढी वारीसाठी मार्गस्थ झाल्या.

संत सोपानदेवांचा आषाढी वारीसाठीचा प्रस्थान सोहळा झाल्यापासून पालखी, पादुका व निवडक वारकरी येथील मंदिर व देऊळवाड्यातच गेली १७ दिवस होते. पालखी वाटचालीत बारामतीच्या पुढे पिंपळी लिमटेक येथे सोपानदेवांसमोर मेंढ्यांचे रिंगण होत असते, तेही प्रातिनिधीक स्वरूपात सासवडला समाधी मंदिराच्या सानिध्यात व देऊळवाड्यात झाले. दरम्यान, सोमवारी (ता. १९) पादुका घेऊन एसटी बस पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या. त्यावेळी टाळ-मृदंगाचा निनाद आणि निवडक दिंड्या-वारकरी यांची उत्साही उपस्थिती होती. ढगाळ वातावरण व मंद वाऱ्याच्या झुळका अंगावर झेलत लोकरंग व भक्तीरंगात मार्गस्थ सोहळा रंगला.

पालखीतील चल पादुका देव संस्थानचे विश्वस्त तथा पालखी सोहळा प्रमुख ॲड. त्रिगुन गोसावी यांनी आणून एसटीच्या बसमध्ये आसनावर ठेवल्या. या सोहळ्यावेळी आमदार संजय जगताप, सासवडचे प्रांत प्रमोद गायकवाड, तहसीलदार रूपाली सरनोबत, नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, उपनगराध्यक्ष वसुधा आनंदे, पोलिस उपअधीक्षक धनंजय पाटील राहुल घुगे आदी उपस्थित होते. पालखी सोहळ्यासाठी दोन बस, एक जादाची बस, दुरुस्ती वाहन, रुग्णवाहिका, वैद्यकीय पथक, पोलिस, प्रशासकीय पथक आहे.

दरम्यान, लगतच्या श्री लक्ष्मीनारायण मंदिरातून आमदार संजय जगताप यांच्या हस्ते आरती करत श्री चांगावटेश्वर पालखीचे प्रस्थान दोन एसटी बसमधून झाले. प्रत्येक पालखीचे चाळीस वारकरी प्रतिनिधी समवेत आहेत.

loading image