Vidhan Sabha 2019 : कुणाचच काय ठरेना! विधानसभा निवडणूक होणार तरी कशी?

ज्ञानेश्वर बिजले
शनिवार, 7 सप्टेंबर 2019

सत्तारूढ भाजप-शिवसेना युती पुन्हा सत्तेवर येण्याची चिन्हे दिसत असली, तरी एकत्रित लढण्याच्या दृष्टीने आवश्‍यक असलेले मतदारसंघांचे वाटप अद्याप जाहीर झालेले नाही. भाजप शिवसेनेपेक्षा जास्त जागा मागत आहे. त्यासाठी ते शिवसेनेवर दबाव वाढवित आहेत. दुसऱ्या बाजूला शिवसेनेनेही निम्म्या जागांचा आग्रह सोडलेला नाही

पुणे : राज्याच्या विधानसभा निवडणुकीचे मतदान सव्वा महिन्यांवर येऊन ठेपले असतानाही निवडणुकीचे राजकीय चित्र अद्यापही अस्पष्ट आहे. राजकीय पक्षांच्या आघाड्या जाहीर होत असल्या तरी, जागा वाटप झालेले नाही. गणेशोत्सवानंतर वेगवान राजकीय घडामोडी अपेक्षित असतानाच महिनाअखेरपर्यंत अनेक पक्षांतील कार्यकर्त्यांचे नाराजीचे सूरही मोठ्या प्रमाणात प्रकट होण्याची चिन्हे दिसत आहेत.

कोल्हापुरात काँग्रेसला मिळाला, तरुण जिल्हाध्यक्ष

युतीचं काय होणार?
सत्तारूढ भाजप-शिवसेना युती पुन्हा सत्तेवर येण्याची चिन्हे दिसत असली, तरी एकत्रित लढण्याच्या दृष्टीने आवश्‍यक असलेले मतदारसंघांचे वाटप अद्याप जाहीर झालेले नाही. भाजप शिवसेनेपेक्षा जास्त जागा मागत आहे. त्यासाठी ते शिवसेनेवर दबाव वाढवित आहेत. दुसऱ्या बाजूला शिवसेनेनेही निम्म्या जागांचा आग्रह सोडलेला नाही. त्यांच्या प्राथमिक पातळीवरील चर्चेच्या फेऱ्या सुरू झाल्या असल्या, तरी दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे लढण्याची तयारीही ठेवलेली आहे. दोन्ही पक्ष युतीच्या माध्यमातून एकत्र लढणार की स्वतंत्रपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, ते ठरल्याशिवाय विरोधी पक्षांनाही निवडणुकीची रणनिती ठरविता येणार नाही. युती झाल्यास, काही मतदारसंघांत बंडखोरी होईल, तर काही मतदारसंघांत नाराजीचा फटका सहन करावा लागणार आहे. दोन्ही पक्ष स्वतंत्र लढल्यास, त्याचा फायदा आघाडीच्या उमेदवारांना काही मतदारसंघांत होईल.

गुजरात दंगलीतील ‘हिंदू ऑयकॉन’ सध्या काय करतोय?​

युतीत जागा वाटपाचा तिढा
भाजप व शिवसेनेत अन्य पक्षांतून अनेक नेत्यांनी प्रवेश केला आहे. युती करताना या नेत्यांनाही उमेदवारी देण्याचेही विचारात घ्यावे लागेल. त्याचवेळी संबंधित मतदारसंघातील पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचे म्हणणेही विचारात घ्यावे लागेल. त्यामुळे, जागा वाटपाची प्रक्रिया अधिक क्‍लिष्ट असली, तरी ती लवकर पूर्ण करावी लागेल. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधून काही नेते सत्तारुढ पक्षांत प्रवेश करून लागल्याने, या दोन्ही पक्षांना आघाडीचा निर्णय घेताना फारशा अडचणी येणार नाहीत. त्यांची आघाडी येत्या दहा बारा दिवसांत आकाराला येण्याची शक्‍यता आहे. युती व आघाडी यांच्या मित्र पक्षांनाही मोठ्या संख्येने जागा हव्या आहेत. मात्र, प्रमुख पक्षांचे जागा वाटप निश्‍चित होत नसल्याने, मित्र पक्षांच्या नेत्यांमध्ये अस्वस्था वाढली आहे. युतीमध्ये मित्र पक्षांच्या वाट्याला फारशा जागा येण्याची शक्‍यता कमीच आहे. आघाडीसोबत शेतकरी कामगार पक्ष, राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना यांसह अन्य काही पक्ष आहेत.

वंचित आघाडीत फूट; एमआयएम स्वतंत्र लढणार

मनसे काय करणार?
राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिकाही अद्याप जाहीर व्हावयाची आहे. या दोन आघाड्यांबरोबरच लोकसभा निवडणुकीत प्रकर्षाने पुढे आलेल्या वंचित बहुजन आघाडीमध्येही मतभेद होऊ लागले आहेत. आघाडीसमवेत असलेल्या एमआयएमने स्वतंत्र निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. त्यांच्यात पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. 

या सर्व घडामोडी पाहता राज्यातील राजकीय चित्र सध्यातरी गोंधळाचे आहे. युती, आघाडी यांचे निर्णय झाल्यानंतर, पुन्हा ऐनवेळी पक्षांतर, बंडखोरी ही राजकीय नाट्ये ठिकठिकाणी रंगणार आहेत. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरवात होत असताना ही स्थिती अधिक स्पष्ट आणि रंगतदार होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dnyaneshwar bijale writes blog about political scenario of maharashtra khed vidhan sabha 2019