तुमच्याकडे दुचाकी आहे का? आताच घ्या हेल्मेट! ऑफिसमधील ‘CCTV’ तपासून होणार आता दंडाची कारवाई

अपघातांमध्ये दुचाकी व पादचाऱ्यांची संख्या तुलनेने अधिक (७० ते ८० टक्के) आहे. या पार्श्वभूमीवर ‘आरटीओ’ अधिकाऱ्यांनी शैक्षणिक संस्थांना मोटार वाहन कायद्यातील कलम ‘१९४-अंतर्गत पत्र दिले आहे. cctv पडताळून विनाहेल्मेट येणाऱ्या दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई होणार आहे.
solapur RTO
solapur RTOsakal

हेल्मेटविना दुचाकी चालविणारे दुचाकीस्वार अपघातात गंभीर जखमी होत असून मृतांमध्येही त्यांचीच संख्या सर्वाधिक आहे. मद्यपान करून वाहन चालविणे, मोबाईल टॉकिंग, अतिवेग, लेन कटिंग, विनाहेल्मेट, सीटबेल्टविना वाहन चालविणे ही अपघाताची प्रमुख कारणे आहेत. फिटनेस संपलेली वाहने बिनधास्तपणे रस्त्यांवर धावत आहेत. लायसन्स नसतानाही वाहन चालविणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. विमा, पीयूसी नसतानाही अनेक वाहने चालतात.

अशा बेशिस्त वाहनचालकांना स्वयंशिस्त लागावी म्हणून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मोटार वाहन निरीक्षक संदीप शिंदे, अरविंद फुलारी, किरण खंदारे, महेश रायबान, सागर पाटील व सुखदेव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहायक मोटार वाहन निरीक्षक अतुल दराडे, प्रियांका माने, अक्षय जाधव, मयूर जाधव, सिद्राम कोलाटे, विशाल नाझिरकर यांची तीन पथके सोलापूर शहराबरोबरच बार्शी, अक्कलकोट, मंगळवेढा, पंढरपूर, मोहोळ, उत्तर व दक्षिण सोलापूर या भागात कारवाई करीत आहेत. वाहन चालक राकेश कांबळे, प्रमोद महाडिक व नामदेव व्हनमराठे यांचीही मदत होत आहे.

विनाहेल्मेट, विनासिटबेल्ट वाहन चालविणाऱ्यास प्रत्येकी एक हजार रुपये, वाहनाचा विमा, फिटनेस नसल्यास प्रत्येकी चार हजारांचा तर लेन कटिंग, पीयूसी नसल्यास पाचशे रुपयांचा दंड आकारला जात आहे.

काय सांगतो वाहतूक नियम ‘१९४ ड’

मोटार वाहन कायदा १९८८मधील कलम ‘१९४-ड’मधील तरतुदीनुसार हेल्मेट वापरासंबंधी तरतुदीचा भंग करणाऱ्या किंवा त्यास संमती देणाऱ्या व्यक्तीस दंडाची तरतूद आहे. दरम्यान, आता दंडात्मक कारवाई करताना शैक्षणिक संस्था, बॅंका, सरकारी व खासगी कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज पडताळून विनाहेल्मेट दुचाकीवरून आलेल्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी संबंधित कार्यालयातील अधिकाऱ्यांनी आपल्या संस्थेच्या आवारात विनाहेल्मेट प्रवेश करणाऱ्या दुचाकीस्वारावर कारवाई करावी, अशी अपेक्षा आहे. आता शाळा-महाविद्यालये सुरु झाल्यानंतर तेथील सीसीटीव्ही फुटेज पाहून विनाहेल्मेट दुचाकीवरून येणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

अपघात रोखण्यासाठी विशेष मोहीम

वाहतुकीच्या नियमांचे तंतोतंत पालन केल्यास निश्चितपणे अपघात व अपघाती मृत्यू होणार नाही. पण, अनेक वाहनचालक अतिवेगाने वाहन चालवतात, लेन कटिंग करतात. हेल्मेट, सीटबेल्टचा वापर करीत नाहीत. त्यामुळेच आता मोटार वाहन कायद्यातील कलम ‘१९४-ड’नुसार विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल. जीवघेणे अपघात रोखून संबंधिताच्या कुटुंबाची वाताहत थांबावी हाच कारवाईचा मूळ हेतू असेल.

- अर्चना गायकवाड, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com