राज्यातील निवासी डॉक्‍टर अखेर कामावर रुजू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 मार्च 2017

मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर अखेर निवासी डॉक्‍टरांनी शुक्रवारी रात्री कामावर रुजू होण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार राज्यातील काही महाविद्यालयांतील डॉक्‍टरांनी शुक्रवारी रात्री मस्टरवर सह्या केल्या. तर काही रुग्णालयांतील डॉक्‍टर शनिवारी सकाळच्या कर्तव्यावर रुजू झाले. डॉक्‍टरांवर होणाऱ्या हल्ल्यांविरोधात राज्यातील 17 वैद्यकीय रुग्णालयांतील सुमारे 4500 निवासी डॉक्‍टर सामूहिक रजेवर गेले होते.

निवासी डॉक्‍टरांच्या संपाने मंगळवारी वेगळे वळण घेतले. त्यानंतर वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, मुंबई उच्च न्यायालयाने सुरक्षेची हमी देऊनही निवासी डॉक्‍टरांनी संप सुरूच ठेवण्याचा निर्धार केला होता. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत खडे बोल सुनावले. न्यायालयाने कारवाईचा आदेश दिला तरीही जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाहीत तोपर्यंत काम बंद आंदोलन मागे न घेण्याचे डॉक्‍टरांनी ठरवले होते. अखेर राज्याच्या वैद्यकीय शिक्षण संचालनालयाच्या संचालकांकडून मान्य झालेल्या मागण्या लेखी मिळाल्यानंतर निवासी डॉक्‍टरांनी कामावर रुजू होण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार निवासी डॉक्‍टर काल रात्री रुजू झाले. केईएम रुग्णालयातील डॉक्‍टरांनी प्रातिनिधिक स्वरूपात राज्यातील डॉक्‍टर कामावर रुजू झाल्याचे जाहीर केले. तसेच जे डॉक्‍टर रुजू नाही होऊ शकले ते सोमवारी रुजू होणार असल्याचे सांगितले.

महत्त्वाची तरतूद
- सरकारी रुग्णालयांत रुग्णांना भेटण्यासाठी औपचारिक वेळ पाळावी लागणार.
- प्रवेशास उशीर झाल्यास डॉक्‍टरांना उर्वरित कालावधी परीक्षेनंतर पूर्ण करता येणार.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: doctor join hospital