JusticeForPayal : रॅगिंगचा बळी ठरलेल्या पायल तडवीचे काय चुकले?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 मे 2019

तीन डॉक्‍टर निलंबित 
नायर रुग्णालयातील स्त्रीरोग विभागात बुधवारी (ता. 22) दोन शस्त्रक्रिया केल्यानंतर डॉ. पायल वसतिगृहातील खोलीत आल्या. त्यानंतर त्यांनी खोलीतील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. डॉ. पायल यांचा स्त्रीरोग विभागातील तीन डॉक्‍टरांकडून वर्षभर छळ सुरू असल्याचा आरोप आहे.

नाशिक : मुंबईच्या नायर रुग्णालय वसतिगृहात जळगावच्या पायल तडवी या शिकाऊ डॉक्‍टरने रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केल्याने वैद्यकीय शिक्षण विभाग धास्तावला आहे. कुटुंबीयांनी कष्ट करून पायलला डॉक्टर बनविले, पण आपल्या सामाजिक व्यवस्थेने तिला भविष्यातील स्वप्न पूर्ण करण्यापासून रोखले. आता पुढील कारवाई होईल, पण याला आणखी किती पायल बळी पडणार आहेत, हा मोठा प्रश्न आहे. रॅगिंग प्रतिबंधक कायदा असूनही रॅगिंग होत असल्याने हा विभाग चक्रावला आहे. रॅगिंगला आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक तरतुदी करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्या अध्यक्षतेखाली वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी त्रिसदस्यीय समिती स्थापन केली. 

आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर, मुंबईच्या केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांचा समितीत समावेश आहे. वैद्यकीय शिक्षणातील विद्यार्थी आणि अध्यापक यांच्यात संवाद राहिला नसल्याने रॅगिंगच्या घटना घडत असल्याची बाब वैद्यकीय शिक्षण विभागाच्या निदर्शनास आल्याने कायद्यात दुरुस्ती करीत असताना दोषींविरुद्ध कडक कारवाई करणे आणि सहा महिन्यांतून एकदा समुपदेशन करणे, या बाबींचा कायद्यातील तरतुदींत समावेश करण्यासंबंधी ही समिती विचारविनिमय करणार असल्याची माहिती महाजन यांनी "सकाळ'ला दिली. 

पायलच्या आत्महत्येची चौकशी करण्यासाठी मुंबई महापालिकेने समिती स्थापन केली आहे. शहरी आणि ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव होत असल्याची बाब पायलच्या आत्महत्येने अधोरेखित झाली. त्या अनुषंगाने नेमकी काय कारवाई केली, यासंबंधीचा अहवाल चार दिवसांत मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांच्याकडून महाजन यांनी मागितला. रॅगिंगच्या घटनांविषयीची कारवाई आरोग्य विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण सेवा विभागातर्फे केली जाते. त्यामुळे पायलच्या आत्महत्येचा घटनेची दखल विद्यापीठ कशी घेणार, याकडे वैद्यकीय विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे लक्ष लागले आहे. 

तीन डॉक्‍टर निलंबित 
नायर रुग्णालयातील स्त्रीरोग विभागात बुधवारी (ता. 22) दोन शस्त्रक्रिया केल्यानंतर डॉ. पायल वसतिगृहातील खोलीत आल्या. त्यानंतर त्यांनी खोलीतील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. डॉ. पायल यांचा स्त्रीरोग विभागातील तीन डॉक्‍टरांकडून वर्षभर छळ सुरू असल्याचा आरोप आहे. डॉ. पायल यांचा मानसिक छळ केल्याचा आरोप असलेल्या तीन डॉक्‍टरांना मार्ड संघटनेतून तात्पुरते निलंबित करण्याची कारवाई सेंट्रल 'मार्ड'ने केली आहे. त्याचप्रमाणे ठोस भूमिका न घेतल्याबद्दल स्त्रीरोग विभागाच्या प्रमुखांना निलंबित करण्याची मागणी केली आहे, असे सेंट्रल 'मार्ड'च्या अध्यक्ष डॉ. कल्याणी डोंगरे यांनी सांगितले. अशा घटना पुन्हा घडू नयेत, याबाबत निवासी डॉक्‍टरांच्या संघटनेने नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांच्याशी चर्चा केली. राज्यभरातील सरकारी व महापालिका रुग्णालयांतील निवासी डॉक्‍टरांसाठी समुपदेशनात्मक कार्यक्रम राबवणार असल्याची माहिती डॉ. कल्याणी डोंगरे यांनी दिली.

पायल तडवी हिच्या आत्महत्येप्रकरणी पोलिस तपास करीत आहेत. त्याचवेळी समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती पुढील निर्णय घेईल. मात्र, वैद्यकीयच्या पदव्युत्तर शिक्षणात अशी घटना पहिल्यांदा घडल्याने रॅगिंग कायद्यात बदलासंबंधी स्थापन करण्यात आलेल्या समितीतर्फे उपाययोजना आणि तरतुदींचा अहवाल सरकारला सादर केला जाईल. 
- डॉ. तात्याराव लहाने, वैद्यकीय शिक्षण संचालक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Doctor Payal Tadvi Kills Herself At Mumbai Hospital Allegedly Over Casteist Remarks