रुग्णांनी दिलेल्या दानातून ‘कायापालट’

चंद्रशेखर महाजन
बुधवार, 21 सप्टेंबर 2016

प्रत्येक रुग्णांची डॉ. वेखंडे काळजी घेतात, त्यामुळे त्यांच्यावर रुग्णांचा विश्‍वास आहे. हीच त्यांच्या कार्याची पावती आहे. 

- डॉ. शैलेंद्र सवाई, जिल्हा आरोग्य अधिकारी, नागपूर

सरकारी दवाखान्याचे नाव घेतले, की सर्वसामान्य नाक मुरडतात. मात्र रुग्णांच्या दानातून जलालखेडा (ता. नरखेड, जि. नागपूर) प्राथमिक आरोग्य केंद्राचा ‘कायापालट’ डॉ. प्रशांत वेखंडे यांनी केलाय.

केंद्रात चार वर्षांपूर्वी महिन्याला जेमतेम पाचशे रुग्ण यायचे. आता चार हजारांवर रुग्णांची तपासणी होते. येथील ‘२४ तास रुग्णसेवा’ हा फलक रुग्णसेवेची महती सांगतो. जलालखेडाची पाच हजारांवर लोकसंख्या आहे. १५ ते २० खेड्यांचा व्यापार या गावावर अवलंबून आहे. गाव मुख्य रस्त्यावर असल्यामुळे आरोग्य केंद्र ‘हाय रिस्क सेंटर’ आहे. २०१२ पूर्वी म्हणजेच डॉ. वेखंडे केंद्रात येण्यापूर्वी दिवसाला फक्‍त २० रुग्णांची तपासणी व्हायची. वर्षाला ८-१० प्रसूती व्हायच्या. आरोग्य केंद्रातील गैरव्यवहारामुळे काही कर्मचाऱ्यांना घरी जावे लागले. डॉ. वेखंडे ऑक्‍टोबर २०१२ मध्ये येथे रुजू झाले. राजकीय दडपण आणि आरोग्य केंद्रात अपुऱ्या सुविधा ही आव्हाने होती. त्यावर मात करण्यासाठी लोकांचा विश्‍वास जिंकण्याकरिता सुरवातीलाच त्यांनी ‘२४ तास सेवा’चा फलकच लावला. रुग्णांची आपुलकीने विचारपूस सुरू केली. रुग्णसंख्या वाढू लागली. आरोग्य समस्या सुटू लागल्या. सरकारनेही ‘कायापालट’ योजनेतून रुग्ण आणि लोकांकडून दान घेण्याची संधी दिली. रुग्ण आणि लोकांनीही आठ कूलर, पंखे, खाटा, चादरी, ब्लॅंकेट्‌स आणि इतर साधने दिली. प्रत्येक कर्मचारी २४ तास सेवा देऊ लागला. चार वर्षांत जलालखेडा रुग्णालयाचा ‘कायापालट’ झाला. सध्या महिन्याला चार हजार रुग्णांची तपासणी होते. वर्षाला ऐंशीपेक्षा अधिक प्रसूती होतात. ‘ओपीडी’च्या पैशातून एप्रिल ते ऑगस्ट या चार महिन्यांचे ३८ हजारांचे वीजदेयक भरण्यात आले. सर्व प्रकारच्या प्राथमिक चाचण्या फक्‍त पाच रुपयांत होतात. या केंद्रात २७ गावांचा समावेश आहे. पाच उपकेंद्रे आहेत. अमरावती जिल्ह्यातील दहापेक्षा अधिक गावांतील रुग्ण तपासणीला येतात. सर्पदंश, श्‍वानदंशावरील लस २४ तास उपलब्ध असते. आता केंद्राच्या परिसरात शेती होते. केंद्रात १० कर्मचारी आहेत. वैद्यकीय अधिकारी डॉ. वेखंडे यांना दोनदा डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्कार मिळाला आहे.

साहित्यासाठीही आर्थिक मदत

टायफाइड, रक्त चाचणीसाठी आवश्‍यक कीटसुद्धा दानातून मिळते. रुग्णांना प्राथमिक चाचण्यांसाठी खासगी रुग्णालयात जावे लागत नाही. फक्‍त पाच रुपयांत चाचण्या होत असल्याने रुग्णांची गर्दीही वाढते आहे.

प्रत्येक रुग्णांची डॉ. वेखंडे काळजी घेतात, त्यामुळे त्यांच्यावर रुग्णांचा विश्‍वास आहे. हीच त्यांच्या कार्याची पावती आहे. 

- डॉ. शैलेंद्र सवाई, जिल्हा आरोग्य अधिकारी, नागपूर

Web Title: donated by patients 'transformation'

फोटो गॅलरी