'जोखीम' नको, नवे नियम; राज्याच्या विमानतळांना सूचना

प्रवासाचे नियोजन करणाऱ्यांच्या उड्डाणाला खीळ बसली
Airports
Airportsesakal

मुंबई - कोविड संक्रमणाचा दर कमी असल्याने निर्बंधांमधून मोकळीक मिळत असतानाच दक्षिण आफ्रिकेमध्ये सापडलेल्या कोविडच्या नव्या प्रकाराचे संकट घोंगावू लागल्याने प्रवासाचे नियोजन करणाऱ्यांच्या उड्डाणाला खीळ बसली आहे. कोरोना संक्रमणाचा सर्वाधिक धोका असलेले देश म्हणून भारत सरकारने घोषित केलेल्या देशांतून येणाऱ्या प्रवाशांना सात दिवसांचे संस्थात्मक विलगीकरण सक्तीचे करण्यात आले आहे.कोरोनाच्या ‘ओमिक्रॉन’ या प्रकाराचा संसर्ग होऊ नये यासाठी राज्यात हवाई वाहतुकीच्या यासंदर्भात तातडीने अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. केंद्र सरकारने जारी केलेल्या सूचना आणि राज्य सरकारच्या सूचना आजपासूनच अमलात आणण्याचे आदेश दिले आहेत.

देशांतर्गत प्रवास करणाऱ्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले किंवा प्रवासापूर्वी ४८ तास अगोदर आरटीपीसीआर चाचणी करणे सक्तीचे करण्यात आले आहे.कोरोना संक्रमणााचा सर्वाधिक धोका असलेले देश म्हणून भारत सरकारने घोषित केलेल्या देशांतून येणाऱ्या प्रवाशांना सात दिवसांचे संस्थात्मक विलगीकरण सक्तीचे असेल. या काळात दुसऱ्या, चौथ्या आणि सातव्या दिवशी आरटीपीसीआर चाचणी करण्यात येईल. यापैकी कोणतीही चाचणी पॉझिटिव्ह आल्यास त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. सात दिवसांनी कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यास त्यांना घरी जाण्याची मुभा देण्यात येणार आहे. मात्र पुढील सात दिवस त्यांना गृह विलगीकरणात राहण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय विमानांद्वारे येणाऱ्या सर्व प्रवाशांना त्यांनी मागील पंधरा दिवसात ज्या ज्या देशांना भेट दिली आहे, त्यांची सविस्तर माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे. या बाबतच्या सूचना इमिग्रेशन डीसीपी आणि ‘एफ.आर.आर.ओ.’ यांना देण्यात आल्या आहेत. ‘मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड’नेही (एमआयएएल) राज्य सरकारच्या सर्व नियमांची माहिती सर्व विमान कंपन्यांना द्यावी आणि त्याची अंमलबजावणी करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. चुकीची माहिती देणाऱ्या प्रवाशांना आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५च्या विविध कलमांखाली कारवाईही होऊ शकते, असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.

धोकादायक नसलेल्या इतर देशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी ‘आरटीपीसीआर’ चाचणी विमानतळावर उतरल्यावर करणे बंधनकारक असेल आणि चाचणी अहवाल निगेटिव्ह असल्यासही त्यांना १४ दिवस गृह विलगीकरणात राहावे लागेल.आंतरराष्ट्रीय विमान प्रवास करून आलेल्यांना भारतातील इतर शहरात विमानाने जायचे असल्यास, महाराष्ट्रामध्ये विमानतळावर पहिल्यांदा आल्या आल्या ‘आरटीपीसीआर’ चाचणी करावी लागेल आणि निगेटिव्ह अहवाल आल्यास त्यांना कनेक्टिंग विमानांमध्ये बसण्याची परवानगी देण्यात येईल.

देशांतर्गत हवाई प्रवासासाठी सूचना

- प्रवाशांचे पूर्णपणे लसीकरण असणे आवश्यक आहे. असे नसेल तर त्यांच्याजवळ प्रवासाच्या आधी ४८ तास अगोदरची ‘आरटीपीसीआर’ अहवाल बंधनकारक

- इतर राज्यातून येणाऱ्या विमान प्रवाशांसाठी ४८ तासांच्या आतील ‘निगेटिव्ह आरटीपीसीआर’ चाचणी अहवाल असणे बंधनकारककेंद्र सरकारची मार्गदर्शक तत्त्वे राज्याने लागू केली आहेत. जर स्थानिक प्रवाशाचे लसीकरण पूर्ण झाले असेल म्हणजेच त्याने दोन्ही डोस घेतले असतील, तर त्याला प्रवास करता येणार आहे. लस घेतलेल्यांना ‘आरटीपीसीआर’ची गरज नसेल. अतिजोखमीच्या देशातून आलेल्या प्रवाशांचा १०-१५ दिवसांचा प्रवास तपशील तपासला जाईल. त्यांना आरटीपीसीआर चाचणी, सात दिवसांचे विलगीकरण बंधनकारक आहे. त्यानंतर त्यांची चाचणी निगेटिव्ह आल्यास ते प्रवासी आपल्या कामाला जाऊ शकतात, असा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे.

- राजेश टोपे, आरोग्यमंत्री, महाराष्ट्र

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com