मोह, घाई, अज्ञान नकोच! चुकीच्या एका क्लिकमुळे रिकामे होईल तुमचे बॅंक अकाउंट

सायबर क्राइम ऑनलाइन फ्रॉडचे प्रमाण देखील वाढू लागले आहे. कमी दिवसात तथा वेळेत जादा रिटर्न देण्याचे आमिष, मोह दाखवून वेगवेगळ्या फंड्यातून लोकांची फसवणूक करीत आहेत. त्याला कोणीही बळी पडू नये, असे आवाहन सायबर पोलिसांकडून केले जात आहे.
CYBER CRIME
CYBER CRIMESAKAL

सोलापूर : कोरोनानंतर बऱ्यापैकी आर्थिक व्यवहार ऑनलाइन झाले आहेत. त्यामुळे प्रत्येक बँक ग्राहकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रयत्न करत आहेत. मात्र, सायबर क्राइम ऑनलाइन फ्रॉडचे प्रमाण देखील वाढू लागले आहे. कमी दिवसात तथा वेळेत जादा रिटर्न देण्याचे आमिष, मोह दाखवून वेगवेगळ्या फंड्यातून लोकांची फसवणूक करीत आहेत. त्याला कोणीही बळी पडू नये, असे आवाहन सायबर पोलिसांकडून केले जात आहे.

घरबसल्या वर्कऑर्डर मिळेल, कमी पैसे गुंतवा आणि चांगला रिटर्न मिळवा. लोन ॲपच्या माध्यमातून कोणतीही कागदपत्रे न देता कर्ज मिळवा, इन्स्टाग्राम, टेलिग्रामवरील सेलिब्रेटीला फॉलो करा आणि घरबसल्या पैसे कमवा यासोबतच सेक्सॉटर्शन, ई-केवायसी करा, अन्यथा दंड लागेल, असे फंडे वापरून सायबर गुन्हेगार सावज शोधत आहेत. ग्राहकांची दिशाभूल करून त्यांच्या घामाचे पैसे लुबाडण्याचा हॅकर्सकडून डाव आखले जात आहेत. ग्राहकांनी त्याला बळी पडू नये. खोट्या मेसेजच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकार सध्या वाढले आहेत. सायबर गुन्हेगार लोकांना जाळ्यात अडकवून त्यांची आयुष्याची कमाई काही सेकंदात लुटून नेत आहेत. त्यासाठी प्रत्येकांनी जागरूक राहणे गरजेचे असल्याचेही सायबर पोलिसांनी म्हटले आहे.

अशी घ्यावी लोकांनी दक्षता

  • क्युआर कोड स्कॅन केल्याने पैसे जातात, येत नाहीत ही माहिती हवी

  • अनोळखी मेसेज किंवा कॉल आल्यास मोह,अज्ञान व घाई न करता त्याची खात्री करावी

  • कमी वेळेत जास्त पैसा कमविण्याच्या आमिषाला बळी पडू नका

  • ‘गुगल’वर कस्टमर केअरवरून नंबर सर्च करताना खालील वेबसाइट त्याच कंपनीची असल्याची खात्री करा

  • व्हॉट्‌सॲपवरील व्हिडिओ कॉल रेकॉर्ड होतो; सेक्‍सटॉर्शनचे शिकार होण्यापूर्वी सावधानता बाळगा

  • गरज नसताना अनावश्यक इंटरनेटचा वापर किंवा कोणतेही ॲप, कोणतीही साईट पाहणे टाळावे

‘केवायसी’साठी बॅंका मेसेज-कॉल करत नाही

मार्चएण्ड असल्याने आता अनेक बॅंकांच्या ग्राहकांना तत्काळ केवायसी अपडेट करण्यास सांगितले जात आहे. त्यात मेसेजसोबत लिंकही येते. ज्यावर ग्राहकांना क्लिक करण्यास सांगितले जाते. तसे न केल्यास खाते ब्लॉक होईल, असेही म्हटले जाते. ग्राहक त्या मेसेजला फसतात आणि लिंकवर क्लिक करतात. यानंतर ग्राहकांच्या खात्यातून पैसे काढल्याचे मेसेज येतात. बँक कधीच तुम्हाला ओटीपी, सीव्हीव्ही किंवा वैयक्तिक माहिती ईमेल किंवा एसएमएसवरून शेअर करण्यास सांगत नाही.

‘महावितरण’ कधीच मोबाईलवर मेसेज पाठवत नाही

तुमचे लाइट बिल थकले असून आजच्या आज खाली दिलेल्या लिंकवर पैसे पाठवा, अन्यथा रात्री नऊ वाजेपर्यंत तुमचे लाइट कनेक्शन कापले जाईल, अशा प्रकारचे मेसेज लोकांना त्यांच्या मोबाईलवर पाठवले जात आहेत. पण, वास्तविक पाहता कोणत्याही ग्राहकाच्या वैयक्तिक नंबरवर ‘महावितरण’ तसे मेसेज पाठवत नाहीत, हे प्रत्येकांनी ध्यानात घ्यायला हवे.

अधिकृत माहिती तपासूनच पुढे जावे

अज्ञात व्यक्तीवर विश्वास ठेवून आमिषाला बळी पडू नका. कोणत्याही अनोळखी संकेतस्थळाला भेट न देता अधिकृत माहिती तपासूनच व्यवहार करावेत. सायबर गुन्हेगार वेगवेगळे आमिष व फंडे वापरून लोकांची फसवणूक करीत आहेत.

- शौकतअली सय्यद, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर सेल, सोलापूर शहर

फसवणूक झाल्यास काय कराल...

सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक झालेल्यांनी ‘एनसीसीआरपी’ या पोर्टलवर ऑनलाइन तक्रार नोंदवावी. त्याशिवाय तत्काळ जवळच्या सायबर पोलिस ठाण्याशी संपर्क साधून देखील तक्रार देता येईल. तसेच तुमच्या बॅंकेच्या संबंधित शाखेत जाऊन तशी तक्रार नोंदवावी. जेणेकरून आपल्या खात्यातील पैसे लंपास होण्यापासून बचाव होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com