भाजपचा भ्रष्टाचाराबाबत दुटप्पी चेहरा उघड - सचिन सावंत

भाजपचा भ्रष्टाचाराबाबत दुटप्पी चेहरा उघड - सचिन सावंत

मुंबई - राज्य सरकारने नुकतेच अतिमहत्त्वांच्या व्यक्तींसाठी भाडेतत्त्वावर हवाई प्रवासासाकरिता एजन्सीची नियुक्त करून त्यांच्या माध्यमातून "ऑगस्टा वेस्टलॅंड' या विवादास्पद कंपनीची हेलिकॉप्टर भाड्याने घेतल्याने राज्य सरकार आणि भाजपचा भ्रष्टाचाराबाबतचा दुटप्पी चेहरा उघडा पडला आहे, अशी टीका कॉंग्रेस सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना सावंत म्हणाले, की आघाडी सरकारने 2014 च्या सुरवातीला "ऑगस्टा वेस्टलॅंड' आणि "फिनमेकॅनिका' या दोन्ही कंपन्यांवर बंदी घालण्याची प्रक्रिया सुरू केली होती. हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणात भ्रष्टाचारात या कंपन्या दोषी आढळल्या असून, त्यांच्याविरोधात आघाडी सरकारने "सीबीआय' आणि "ईडी'ची चौकशी सुरू केली होती. या कंपन्यांशी सर्व व्यवहार बंद करण्याचे पाऊलही उचलले होते. परंतु भ्रष्टाराबाबत ओरड करणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारने गेल्या तीन वर्षांत या कंपन्यांवर कारवाई केलेली नाही. उलट "मेक इन इंडिया' असेल किंवा नेवल हेलिकॉप्टर खरेदी प्रक्रियेत या कंपनीला सहभागी करून घेतले.

फॉरेन इनव्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डाकडून संयुक्त भागिदारीतील उपक्रमांकरिता परवानगी देण्यात आली होती, असा आरोप झाला होता. यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाने स्पष्टीकरण देऊन हे सांगितले, की ऑगस्टा वेस्टलॅंड आणि "फिनमेकॅनिका' संबंधित सहा कंपन्यांच्या सहभाग असणाऱ्या सर्व खरेदी प्रक्रिया थांबविण्यात आल्या असून, या सरकारच्या काळात या कंपन्यांकडून कुठलीही नवीन खरेदी केली जाणार नाही. तसेच नौदलासाठी 100 हेलिकॉप्टर खरेदी करण्याच्या प्रक्रियेतूनही या कंपन्यांना वगळण्यात आले आहे, असे सरकारने सांगितले होते, असे सावंत म्हणाले.

सावंत म्हणाले, की तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी तर फिनमेकॅनिका आणि त्याच्या उपकंपन्यांकडील सर्व प्रस्ताव, विनंत्या थांबविण्यात आल्या आहेत. तसेच या कंपन्यांना काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरू असून, या प्रकरणी कायदे मंत्रालयाला टिप्पणी पाठविण्यात आली आहे, असे एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. या प्रकरणात भ्रष्टाचाराला पाठीशी घालणार नाही, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आश्वासनानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी तर या कंपन्या बनावट आणि फसवणूक करणाऱ्या आहेत, असेही म्हटले होते.

या सर्व पार्श्वभूमीवर भाजपचा चेहरा उघडा पडत असताना महाराष्ट्रातील फडणवीस सरकारने त्यावर मल्लीनाथी केली आहे. 4 मे रोजीच्या राज्य सरकारच्या निर्णयानुसार मुख्यमंत्र्यांसह भाजप सरकारमधील सर्व महत्त्वाच्या व्यक्ती ऑगस्टा वेस्टलॅंड कंपनीच्या हेलिकॉप्टरमधून आरामदायक प्रवास करणार आहेत, हे सिद्ध झाले आहे. कंपन्यांच्या हेलिकॉप्टरसाठी दरसुद्धा निश्‍चित करण्यात आलेले आहेत. यातून भाजपच्या उक्ती आणि कृती मधला फरक स्पष्ट होतो. कोणत्या दबावाखाली हा निर्णय घेतला तसेच या हेलिकॉप्टरच्या भाड्यासाठी दिलेल्या दराची चौकशी करावी, अशी मागणी सावंत यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com