डॉ. बाबासाहेबांनी उभारलेल्या वास्तूंचे संवर्धन आवश्‍यक 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 एप्रिल 2018

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी जगभर आहेत. त्याचप्रमाणे बाबासाहेबांच्या स्पर्शाने, सहवासाने, पुढाकाराने पुनित झालेल्या अनेक वास्तू, संस्था जगातील विविध ठिकाणी आहेत.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी जगभर आहेत. त्याचप्रमाणे बाबासाहेबांच्या स्पर्शाने, सहवासाने, पुढाकाराने पुनित झालेल्या अनेक वास्तू, संस्था जगातील विविध ठिकाणी आहेत.

महू येथील त्यांचे जन्मस्थळ, लंडन येथे शिक्षण घेत असतानाचे त्यांचे निवासस्थान, औरंगाबाद व मुंबई येथे त्यांनी सुरू केलेल्या शैक्षणिक संस्था, नागपुरातील दीक्षाभूमी, मुंबई येथील चैत्यभूमी ही स्थळे एकतर दुर्लक्षित आहेत किंवा या स्थळांचा अपेक्षित विकास झालेला नाही. याशिवाय इंदू मिल येथील स्मारक, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश येथील स्मारक ही सर्व स्थळे आंबेडकरी अनुयायी किंवा त्यांच्या विचाराने प्रेरित झालेल्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहेत. त्यामुळे बाबासाहेबांचे विचार योग्य पद्धतीने सर्वसामान्यांपर्यंत पोचविण्यासाठी या स्थळांचा विकास करणे आवश्‍यक आहे. 

नागसेनवनाची दुरवस्था 
औरंगाबाद : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गोरगरीब, दलित, श्रमिक, शेतकरी, शेतमजूर, उपेक्षित अशा सर्व घटकांना शिक्षणाची दारे खुली करण्यासाठी नागसेनवन या शैक्षणिक परिसराची निर्मिती केली. पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमाने बाबासाहेबांनी संपूर्ण परिसर विकसित केला. मात्र, संस्थेच्या अंतर्गत कलहामुळे संपूर्ण परिसर दुर्लक्षित झाला. बाबासाहेबांच्या शैक्षणिक संस्था टिकवण्यासाठी आता समाजानेच एकत्र येण्याची गरज निर्माण झाली आहे. दोनशे एकरांपेक्षा अधिक जागेवर नागसेनवन शैक्षणिक परिसर आहे. त्यात 1950 मध्ये सुरू झालेले मिलिंद महाविद्यालय, त्यानंतर मिलिंद मल्टिपर्पज हायस्कूलची निर्मिती झाली. इंग्रजीचे शिक्षण देणाऱ्या या शाळेत पूर्वी हजारावर असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या आता केवळ पाचशे-सहाशेवर आली आहे. याशिवाय शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचीही प्रचंड दुरवस्था झालेली आहे. संपूर्ण परिसराला संरक्षण भिंत नसल्याने नागसेनवनावर अतिक्रमणे होत आहेत. 

वसतिगृहांची दुरवस्था 
बाबासाहेबांनी ब्रिटिश संसदेच्या धर्तीवर अजिंठा वसतिगृहाची निर्मिती केली. सुरवातीला मुख्य वसतिगृह म्हणून ओळख असलेल्या या वसतिगृहाचे "अजिंठा' असे नामकरण झाले. ब्रिटिश बनावटीची छाप असलेल्या या वसतिगृहाची रचनाही अफलातून आहे. आज मात्र दोन्ही वसतिगृहांची दुरवस्था झाली आहे. 

मिलिंद रंगमंच 
नागसेनवनात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, या प्रमुख उद्देशाने बाबासाहेबांनी रंगमंचाची कल्पना मांडली होती. पुढे बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर साधारण दोन वर्षांनी रंगमंचाच्या कल्पनेला मूर्त स्वरूप आले. रंगमंच खुले झाले झाल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मराठवाड्यातील पहिला अर्धपुतळाही 14 एप्रिल 1980 रोजी बसवण्यात आला. या रंगमंचची सध्या दुरवस्था झाली आहे. मिलिंद महाविद्यालयाच्या इमारतीसमोरील प्रांगणात ऍम्फी थिएटरची (खुला रंगमंच) संकल्पना निर्माण केली होती. प्रांगणाच्या एका कोपऱ्यात सर्वांना दिसेल अशा ठिकाणी हा मंच बाबासाहेबांनी तयार केला होता. मात्र या ठिकाणी आता चक्क वाहनतळ करण्यात आले आहे. 

दीक्षाभूमी पर्यटनस्थळ म्हणून घोषित 
नागपूर - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्‍टोबर 1956 मध्ये कोटी-कोटी अस्पृश्‍यांना तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांचा धम्म दिला. ती अस्पृश्‍यांची मुक्तिभूमी अर्थात "प्रकाशमार्ग' दाखवणारी दीक्षाभूमी म्हणून आकाराला आली. गेल्या 50 वर्षांत दीक्षाभूमीवर साडेपाच कोटी रुपये खर्च करून बाबासाहेबांचे भव्यदिव्य असे स्मारक उभारले. या स्मारकाला आता विद्यमान सरकारने पयर्टनस्थळ घोषित केले. 325 कोटी रुपयांच्या विकासाचा आराखडा तयार केला. दीक्षाभूमीवर प्रवेश करण्यासाठी तीन प्रवेशद्वार सज्ज आहेत. मात्र, चौथे प्रवेशद्वार सुरूच झाले नाही. वर्षानुवर्षे ते बंद आहे. कृषी विभागाकडील दीक्षाभूमीचे चौथे प्रवेशद्वार सुरू करावे, हीच एकमेव मागणी आहे. 

आगामी काळातील कार्य 
-धम्मसंस्कार व प्रशिक्षण केंद्र 
-संशोधन तसेच संदर्भ अभ्यास केंद्र 
-बुद्धिस्ट सेमिनरी 

दीक्षाभूमीवरील 120 फूट उंचीच्या "डोम'च्या नूतनीकरणासाठी केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या डॉ. आंबेडकर फाउंडेशनने 10 कोटी मंजूर केले. त्यातून हा विकास होईल. कृषी विभागाच्या दिशेला दीक्षाभूमीचे चौथे प्रवेशद्वार आहे. ते सुरू करण्यात यावे, यासाठी राज्याचे मुख्य सचिव यांच्याकडे प्रस्ताव देण्यात येईल. त्यांच्याकडून सकारात्मक संकेत मिळाले आहेत. 

-विलास गजघाटे, सदस्य,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमी.

Web Title: Dr. babasaheb ambedkar special